नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील उभाडी येथील बालके व किशोरवयीन मुलांकडून जिल्ह्याबाहेर वेठबिगारीची कामे करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कायदेशीर कारवाई केली असून नागरिकांनी वेठबिगारी सारख्या कुप्रथेस प्रोत्साहन देऊ नये. तसेच आपल्या आजूबाजूच्या परिसरात अशी संशयित बालके, किशोरवयीन मुले असल्यास त्याबाबतची माहिती महसूल, पोलीस, आदिवासी व कामगार विभागांना द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील मौजे उभाडे गावातील काही बालके जिल्ह्याबाहेरील ठिकाणी खाजगी इसमांकडे मेंढीपालनाचे काम करीत असल्याचे मागील काही दिवसात प्रशासनाच्या निदर्शनास आलेली आहे. ही बाब अतिशय गंभीर असून संबंधित इसमाविरुद्ध वेठबिगारी प्रतिबंध कायदा १९७६, बालकामगार अधिनियम १९८६ सुधारित २०१७, अ.जा.ज.का.क. 3( i )( h ), भा.द.वि. कलम ३७४ प्रमाणे पोलीस विभागामार्फत कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे.
नाशिक जिल्ह्यातील अजून काही बालके, किशोरवयीन मुले बेपत्ता असल्याची व मुलांकडून मेंढीपालन, शेतीकामे व इतर वेठबिगार स्वरूपाची कामे काही इसमांकडून, आस्थापना मालकांकडून करून घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेली आहे. ज्या इसमांकडे बालके, किशोरवयीन मुले (१८ वर्षाखालील) कामे करीत असतील त्या इसमांनी त्यांचेकडे कामे करीत असलेली बालके, किशोरवयीन मुले तात्काळ संबधित मुलांच्या पालकांकडे सुखरूप स्वाधीन करावीत. जिल्हा प्रशासनांच्या विविध विभागाकडून संयुक्त तपासणी आयोजन करून अशा बेपत्ता झालेल्या बालकांची चौकशी करण्यात येणार आहे. तसेच अशा वेठबिगारी ची माहिती नागरिकांनी दिल्यास माहिती देणाऱ्यांची नावे गोपनीय ठेवण्यात येतील, असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी केले आहे.
Nashik Collector Threat on Child Labour