नाशिक – वाढत्या कोरोना संसर्गामुळे नाशिक शहरासह जिल्ह्यातील पहिली ते आठवीच्या शाळा १० ते ३१ जानेवारी या काळात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील रुग्णसंख्या शेकडोने वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत आहे. त्यातच आता सोशल मिडियात अफवा पसरविल्या जात आहेत की नाशिकमध्ये लॉकडाऊन लागणार. मात्र, यासंदर्भात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी महत्त्वाला खुलासा केला आहे. जिल्हाधिकारी म्हणाले की, लॉकडाऊनबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. कुणीही अफवा पसरवू नये. सर्वांनी कोविड योग्य वर्तनाचे पालन करावे. तसेच, प्रशासनाला कुठलाही अप्रिय निर्णय घेण्यास भाग पाडू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.