नाशिक – जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने नाशिकमधील कोरोना विरुद्धची लढाई त्यांच्याच नेतृत्वात लढली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ते विविध बैठकांमध्ये व्यस्त होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ, विधानसभेचे प्रभारी अध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यासह अनेक मान्यवरांसोबत त्यांच्या बैठका होत्या. अशातच ते बाधित झाले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे जिल्हाधिकारी मांढरे यांनी स्वतःच्या प्रकृतीकडे जरा सुद्धा दुर्लक्ष केलेले नाही. कोरोनाच्या सर्व नियम ते पाळतच होते. तरीही ते बाधित झाले आहेत. शुक्रवारी (२ जुलै) दिवसभर ते विविध बैठका आणि कामकाजात व्यस्त होते. त्यात नाशिक महापालिका स्मार्ट सिटीच्या बैठकीचाही समावेश होता. दिवसभर या व्यस्ततेत असतानाही मांढरे यांना कुठलाही त्रास जाणवला नाही. मात्र, रात्रीच्या सुमारास त्यांचा घसा दुखू लागला. त्याची तत्काळ दखल त्यांनी घेतली. याप्रकाराकडे दुर्लक्ष न करता त्यांनी आज सकाळीसच कोरोनाची चाचणी करुन घेतली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे वेळीच त्यांनी डॉक्टरांचे मार्गदर्शन घेत उपचार सुरू केले आहेत. घशाची दुखी असो की अन्य किरकोळ लक्षणे याकडे दुर्लक्ष न करणे हेच हिताचे असल्याचा संदेश मांढरे यांनी दिला आहे. अशाच प्रकारे नागरिकांनी काळजी घ्यावी आणि बाधित झाल्याचे लक्षात येताच वेळीच उपचार करुन घ्यावेत, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
—
जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिलेला संदेश असा
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काल दिवसभर काहीही त्रास नव्हता. रात्री घसा दुखू लागल्याने सकाळी टेस्ट करून घेतली. दुसरी लाट जवळपास ओसरली असताना व तिसऱ्या लाटेच्या तयारीला थोडा वेळ असताना या मधल्या टप्प्यात एकदा हा कोरोनाचा टिळा लागून जात आहे, ही समाधानाची बाब आहे. पुढल्या आठवड्यात भेटूच.
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक