एकही नागरिक
मतदार नोंदणीपासून
वंचित राहू नये म्हणून…
- सूरज दि.मांढरे (जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, नाशिक)
‘मताधिकार हा प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर अधिकार आहे’,‘प्रत्येक मत अमूल्य आहे’, अशा प्रकारची वाक्य आपण अनेकदा वाचतो. आपण सामान्य परिस्थितीत राहत असू तर कदाचित संविधानाने देऊ केलेल्या या अधिकाराचं मूल्य, आणि या वाक्याचं सत्त्व आपल्याला जाणवेलच असं नाही. पण ज्यांच्या पुढे रोजच्या जगण्याविषयी अनंत प्रश्न आहेत, अशा समाज घटकांसाठी हा अधिकार मिळवणं किंवा प्राप्त होणं, ही तुम्हा-आम्हाला वाटते तितकी सोपी बाब नसते. लोकशाही व्यवस्थेत सहभागी होण्याची पहिली पायरी मतदार नोंदणी असते हे मान्य केले, तर आपले अनेक बंधू-भगिनी या प्राथमिक हक्कांपासून वंचित राहताना आढळून येतात.
बेघर किंवा पदपथावर राहणाऱ्या व्यक्ती, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि तृतीय पंथी यांनाही संविधानाने तुमच्या-आमच्या इतकाच समान मताधिकार बहाल केलेला आहे. पण, कधी आवश्यक दस्तावेजांच्या कमतरतेमुळे, कधी अपुऱ्या माहितीमुळे आपले हे बंधू-भगिनी या घटनात्मक अधिकाराला मुकतात. खरंतर भारत निवडणूक आयोगाने त्यांच्या जगण्याचा विचार करून त्यांच्यासाठी दस्तावेजांची विशेष सवलत दिलेली आहे. या लेखाच्या निमित्ताने मला त्यांच्यासाठी असणाऱ्या खास सवलतींचा, दस्तांचा परिचय करून द्यायचा आहे.
नाव नोंदणी करताना आवश्यक कागदपत्रे :
मतदार म्हणून नाव नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकाने अर्ज क्रमांक ६ भरणं आवश्यक आहे. या अर्जानुसार सदर नागरिकाने पुढील पाच गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे : १) अर्जदार भारताचा नागरिक असावा २) स्वतःचं छायाचित्र ३) इतर कोणत्याही मतदार यादीत नाव नाही याविषयीचे प्रतिज्ञापत्र, जे अर्ज क्रमांक ६ मध्येच अंतर्भूत असतं ४) वयाचा दाखला ५) निवासाचा पुरावा या पाच दस्तावेजांपैकी पहिल्या तीन दस्तावेजांची पूर्तता करण्यात बेघर किंवा पदपथावर राहणाऱ्या व्यक्ती, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि तृतीय पंथी यांना शक्यतो अडचणी येत नाहीत. त्यांना अडचण येते ती चार आणि पाच क्रमांकांच्या दस्तावेजांबाबत.
१८ ते २१ वय असलेल्यांसाठी वयाचा पुरावा :
मतदार यादीत नाव नोंदणी करताना वयाचा पुरावा म्हणून पुढीलपैकी कोणत्याही एका दस्तावेजाची आवश्यकता असते :१) जन्म दाखला २) शाळा सोडल्याचा दाखला ३) जन्मतारखेची नोंद असलेली पाचवी /आठवी /दहावी /बारावी यांपैकी एका इयत्तेची गुणपत्रिका ४) पॅन कार्ड ५) वाहन चालक परवाना ६) भारतीय पासपोर्ट ७) आधार कार्ड मात्र बेघर किंवा पदपथावर राहणाऱ्या व्यक्ती, देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया आणि तृतीय पंथी यांची जीवनशैली पाहता त्यांना या दस्तावेजांची पूर्तता करणं कठीणच नव्हे, तर जवळजवळ अशक्य आहे. अपुरं शिक्षण आणि त्याचीही कागदोपत्री नोंद नसणं ही या घटकांबाबत सर्रास आढळून येणारी बाब आहे. मग या घटकांना वयाच्या दस्तावेजाची पूर्तता कशी करता येईल? वयाच्या दस्तावेजाची पूर्तता करताना दोन भाग आहेत : एक आहे १८ ते २१ वय असणाऱ्यांसाठी, तर दुसरा आहे
२१ च्या पुढे वय असलेल्यांसाठी.
१८ ते २१ वय असणाऱ्यांसाठी :
१८ ते २१ या दरम्यान वय असेल आणि त्या व्यक्तीकडे वयाचे वरीलपैकी कोणतेही दस्तावेज नसतील तर त्या व्यक्तीच्या पालकाने त्या व्यक्तीचं वय अमुक आहे, असं लेखी प्रतिज्ञापत्र दिलं तर ते ग्राह्य धरलं जातं. किंवा तृतीय पंथीयांमध्ये गुरू पद्धत आहे. त्यांच्या गुरूंनी अर्ज क्रमांक ६ मध्ये दिलेलं जोडपत्र दोन भरून दिलं, तर तेही ग्राह्य धरलं जातं. हे दोन्ही पर्याय शक्य नसल्यास अर्जदार ग्रामपंचायतीचे सरपंच, महानगरपालिका/नगरपालिका यांच्या समितिचे सदस्य यांचही वयाबाबतच प्रमाणपत्र घेऊ शकतात.
२१च्या पुढे वय असल्यास दस्तावेजाची पूर्तता :
जेव्हा अर्जदार २१ पेक्षा जास्त वयाचा असेल व मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्याला म्हणजेच बीएलओला, साहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी (AERO) यांना शारीरिक दृष्ट्या तो त्या वयाचा वाटत असेल, तेव्हा अर्जदाराने सादर केलेले वयाचे प्रतिज्ञापत्र (जोडपत्र तीन) वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरलं जातं. अशा परिस्थितीत वयाचा पुरावा म्हणून अन्य कोणत्याही कागदोपत्री पुराव्याचा आग्रह धरला जात नाही.
निवासाच्या पुराव्याची पूर्तता :
सर्वसामान्य परिस्थितीत मतदार नाव नोंदणी करताना निवासाचा पुरावा म्हणून पुढील दस्तावेजांपैकी कोणतंही एक आवश्यक असतं :१) बँक /किसान /टपाल यांचे चालू खातेपुस्तक म्हणजे पासबुक २) शिधावाटप पत्रिका म्हणजेच रेशनकार्ड ३) भारतीय पासपोर्ट ४) वाहन चालक परवाना ५) अलीकडील भाडेकरार ६) पाणी /टेलिफोन /वीज /गॅस यांचे अलीकडचे देयक म्हणजेच बिल हे देयक तुमच्या स्वतःच्या नावे नसेल, तर तुमच्या जवळच्या नात्यातल्या व्यक्ती -आई /वडील /पती /पत्नी – यांच्या नावे असले तरी चालू शकते. तृतीय पंथीयांच्या बाबतीत ही बिले गुरूच्या नावे असतील तरी चालू शकते ७) प्राप्तीकर निर्देश पत्रिका म्हणजेच इन्कम टॅक्स असेसमेंट ऑर्डर ८) भारतीय टपाल विभागाद्वारे अर्जदाराच्या सध्याच्या निवासस्थानाच्या पत्त्यावर प्राप्त झालेलं कोणतंही टपालपत्र.
मात्र बेघर किंवा पदपथावर भारतीय नागरिक, तृतीय पंथी, शरीर व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया यांना सातत्याने आपला निवास बदलावा लागण्याची शक्यता असते. त्यांना मतदार म्हणून नाव नोंदणी करताना वरीलपैकी कोणताही पुरावा देण्याची आवश्यकता नाही. मतदार ओळखपत्र हे कायदेशीर ओळखपत्र असल्याने सामान्यपणे व्यक्ती ज्या पत्त्यावर जेवते, झोपते तो पत्ता इथे महत्त्वाचा मानला जातो. अर्ज करणारी व्यक्ती सतत पत्ता बदलत असली तरीही सामान्यपणे नाव नोंदणी करताना, ज्या पत्त्यावर तिचं वास्तव्य असेल, तिथंजाऊन सदर व्यक्ती दिलेल्या पत्त्यावरच राहत आहे, याबाबत मतदान केंद्रस्तर अधिकारी दोन-तीन वेळा भेटी देऊन खात्री करून घेतात. तेव्हा अशा वंचित घटकांनी ते जिथं कुठे राहतात, तो पत्ता अर्जात नमूद करून अर्ज दाखल करणं महत्त्वाचं आहे.
नाव नोंदणीनंतर पत्ता बदलल्यास काय करावं?
कायमस्वरूपी कुठेही वास्तव्य नसलेल्या व्यक्तींचे निवास सतत बदलण्याची शक्यता असते. जर अशी व्यक्तीचा नाव पत्ता आधीच्याच मतदारसंघातला असेल, तर तिला अर्ज क्र. ८ अ भरून नव्या पत्त्याची नोंद करावी लागेल. पण, जर ती व्यक्ती अन्य मतदारसंघात वास्तव्यास गेली असेल, तर तिला आधीच्या मतदारसंघातील नाव वगळावं लागेल. ते वगळण्यासाठी तिला अर्ज क्रमांक ७ भरावा लागेल. आणि मग नव्या मतदारसंघात नाव नोंदणी करण्यासाठी अर्ज क्रमांक ६ भरावा लागेल.
नाव, लिंग किंवा इतर तपशिलांच्या दुरुस्तींसाठी काय करावं?
बरेचदा तृतीय पंथीयांनी आधी स्त्री किंवा पुरूष म्हणून नोंदणी केलेली असते आणि अशी नोंदणी करताना त्यांची आधीची नावे मतदार यादीत नोंदवलेली असतात. अशा वेळी त्यांना अर्ज क्रमांक ८ भरून त्यांच नाव आणि लिंग यांमध्ये दुरुस्ती करता येईल.
दिव्यांग मतदारांसाठी सुविधा :
भारत निवडणूक आयोगाने दिव्यांग मतदारांसाठी खास PWD याअॅपची सोय केलेली आहे. या अॅपवरून दिव्यांग मतदारांना नाव नोंदणी करता येईल. तसंच, त्यांनी आधी नोंदणी केली असेल, पण दिव्यांगत्व म्हणून नोंद केली नसेल, अशा व्यक्तींनाही या अॅपवरून त्यांच दिव्यांगत्व चिन्हांकित करता येईल. एकदा अस दिव्यांगत्व चिन्हांकित झालं की त्यांना मतदानाच्या वेळी आवश्यक सुविधा – पोस्टल मतपत्रिका, तीन चाकी, वाहन या सुविधा पुरवणं निवडणूक कार्यालयाला सोयीचं होतं.
नाव नोंदणीच्या सुविधा :
मतदार नाव नोंदणीसाठी खालील ऑनलाइन किंवा ऑफलाइन पर्याय वापरता येतील:
१. NationalVoterServicePortal (www.nvsp.in)
२. Voter Portal Beta (https://voterportal.eci.gov.in/)
३. Voters Helpline App (VHA) मोबाइल अॅप
४. संबंधित मतदार नोंदणी कार्यालय
वरील विवेचनावरून तुमच्या लक्षात आलं असेल की, मतदार नाव नोंदणी किती सोपी आहे! नाव नोंदणी प्रत्यक्ष मतदार नोंदणी कार्यालयात जाऊन करता येते, तशी ती ऑनलाइनही करता येते. मात्र, ज्या अर्जदारांकडे वयाचा किंवा निवासाचा पत्ता म्हणून भारत निवडणूक आयोगाने सांगितलेली कागदपत्रं उपलब्ध नाहीत, त्यांनी ऑनलाइन अर्ज करताना, तीच प्रमाणपत्रे हाताने लिहून सह्या घेऊन, ऑनलाइन अर्जात उल्लेख केल्याप्रमाणे सादर करायची आहेत. मतदार केंद्रस्तर अधिकारी (BLO) घरी येऊन पत्त्याची पडताळणी करतील. तेव्हा आधी अर्ज करणे ही सर्वात महत्त्वाची आणि अनिवार्य पायरी आहे. ऑनलाइन पद्धतीने मतदार नोंदणी कशी करावी, नाव वगळणी कशी करावी यांबाबतचे व्हिडीओ आमच्या CEO Maharashtra या यूट्युब चॅनलवर उपलब्ध आहेत, ते जरूर पाहावेत.
वंचित घटकांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आणि संघटना यांनी या घटकांच्या नाव नोंदणीसाठी पुढाकार घेतला, तर त्यांच्यासाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात नाव नोंदणीची मोहीम राबवता येईल. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने गेल्या काही दिवसांत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था आणि मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण सोसायटी यांच्यासोबत तृतीय पंथी आणि देह व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया यांच्या नाव नोंदणी संदर्भात येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना हा विषय घेऊन राज्यस्तरीय चर्चासत्र, तसेच बैठकी आयोजित केल्या होत्या. या चर्चासत्राला आणि बैठकींना महाराष्ट्रभरातील सदर घटकांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने यंदा १ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. त्यांतर्गत १३-१४ नोव्हेंबर आणि २७-२८ नोव्हेंबर या दिवशी राज्यभर नाव नोंदणीची शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. या शिबिरांतर्गत या वंचित घटकांच्या नाव नोंदणीसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. त्यांच्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांनीही या घटकांच्या नाव नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा आहे.
लक्षात घ्या, सक्षम लोकशाहीची पहिली पायरी मतदार नोंदणी आहे. चला, आधी ती पूर्ण करू आणि मग सारे मिळून मताधिकार बजावू!