नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मुलांमधील अंमली पदार्थांचा गैरवापर व अंमली पदार्थांच्या अवैध तस्करीला प्रतिबंध करण्याच्या उद्देशाने, होणाऱ्या अनुचित घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे राबवण्यासाठी, जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी एका महिन्याच्या आत सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य असल्याचे आदेश आज जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी जारी केले आहेत.
यासंदर्भात जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, शेड्युल एक्स (Schedule X, H व H1), एच व एच 1 औषधे व इन्हेलर विकणाऱ्या औषध विक्रेत्यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई प्रभावीपणे हाताळण्यासाठी मदत व्हावी या हेतुने, संयुक्त कृती आराखड्यामध्ये नमूद केल्यानुसार फौजदारी प्रक्रीया 1973 चे कलम 133 अन्वये यासंदर्भात सदरचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत, असे गंगाथरन डी. यांनी नमूद केले आहे.
या आदेशात पुढे म्हटले आहे की, शेड्युल एक्स, एच व एच.1 औषधे व इन्हेलर विक्री करणारे औषधे विक्रेतेयांनी त्यांच्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य आहे. तसेच दुकानांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे दर्शनी भागात लावण्यात यावेत, जिल्हा औषध नियंत्रण विभागाने नाशिक ग्रामीण विभागातील सर्व औषध विक्रेते दुकानादारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत किंवा नाही याबाबत पडताळणी करावी. हे आदेश निर्गमित केलेल्या दिनांकापासून (23 मार्च 2022) सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासाठी सर्व औषध विक्रेते दुकानदारांना एक महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे, दिलेल्या कालावधीत औषध विक्रेते दुकानदारांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावले नसल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या आदेशाचे जिल्ह्यातील सर्व विभाग आणि नाशिक ग्रामीण हद्दीतील सर्व औषध विक्रेते दुकानदार यांना पालन करणे बंधनकारक असल्याचेही जारी केलेल्या आदेशात जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी नमूद केले आहे.
दृष्टिक्षेपात आदेशाची वैशिष्ट्ये
◼️अंमली पदार्थ विरोधी मोहिम अधिक कठोर
◼️शेड्युल एक्स (Schedule X, H व H1), एच व एच 1 औषधे व इन्हेलर विकणाऱ्या औषध विक्रेत्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे अनिवार्य
◼️दुकानाच्या दर्शनी भागात लावावे लागणार कॅमेरे
◼️23 मार्च पासून एका महिन्याची मुदत
◼️अन्न व औषध प्रशासनामार्फत होणार पडताळणी
◼️अंमलबजावणी न करणाऱ्या औषध विक्रेत्यांवर होणार कारवाई