४० ऑक्सिजन जनरेशन प्लांटच्या माध्यमातून दिवसाला मिळणार ३७ मेट्रीक टन ऑक्सिजन
विशेष प्रतिनिधी, नाशिक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या ऑक्सिजन टंचाईच्या प्रश्नावर मार्ग काढून जिल्ह्यात ४० ऑक्सिजन जनरेशन प्लांट निर्माण करण्यात येत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून दिवसाला ३७ मेट्रीक टन ऑक्सिजन मिळणार आहे, या प्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्याने ऑक्सिजन स्वयंपूर्णतेकडे पाऊल टाकले असल्याचे प्रतिपादन राज्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.
जिल्हा सामान्य रुग्णालयात ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय्, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी.गांडाळ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रशांत खैरे, वैद्यकिय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार उपस्थित होते.
पालकमंत्री छगन भुजबळ पुढे म्हणाले की, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन जनरेशन प्लांटमुळे रुग्णालयाची ऑक्सिजन क्षमता १० केएलने वाढणार आहे. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयाची अंतर्गत ऑक्सिजनची क्षमता २० केएलची होती. पंरतु आज निर्माण करण्यात आलेल्या या नव्या प्लांटमुळे जिल्हा रुग्णालयाची क्षमता ३० केएल झाली आहे. निर्माण करण्यात आलेल्या या प्लांटमुळे नव्याने वाढविण्यात आलेल्या दिडशे बेडला पुरकव्यवस्था म्हणून या प्लांटचा उपयोग होणार आहे, असे यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन प्रकल्प जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला आहे. या प्रकल्पाची दिवसाला २२५ जम्बो सिलिंडर भरण्याची क्षमता असणार आहे. तसेच प्रत्येक उपजिल्हा रुग्णालयात निर्माण करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटची क्षमता दिवसाला १२५ सिलिंडरची असणार असून ग्रामीण रुग्णालयांमध्ये ६० ते ७० जम्बो सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती दिवसाला होणार आहे. त्याचप्रमाणे नाशिक मध्ये उद्योग विभागाकडून ७० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती करणारा एक मोठा प्रकल्प प्रस्तावित आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.









