नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील सिव्हिल हॉस्पिटलचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये दोन बोगस डॉक्टर आढळून आल्यानंतर आता चक्क चोरीचा प्रकार उघड झाला आहे. मात्र, हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरीचा प्रकार फसला आहे.
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी दोन बोगस डॉक्टरांना पकडून दिले होते. आणि आज हॉस्पिटलमध्ये दोन चोरट्यांना पकडून दिले आहे. कर्मचाऱ्यांनी मोठे धाडस दाखविले असले तरी हॉस्पिटल प्रशासनाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. कारण, कर्मचाऱ्यांनी पकडून दिलेल्या व्यक्तींविरोधात प्रशासनाने तक्रार लवकर न दिल्याने मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
सिव्हिल हॉस्पिटलची सुरक्षा राम भरोसे असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. भरदिवसा दोन मद्यधुंद व्यक्ती सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात आले. त्यांच्यासोबत रिक्षाही होती. हॉस्पिटलच्या आवारातून ऑक्सिजन सिलेंडरच्या वाहतुकीसाठीची विविध उपकरणे चोरुन नेण्याचा या भामट्यांचा प्रयत्न होता. मात्र, साफसफाई करणाऱ्या निरीक्षकांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना ही बाब कळविली. त्यानंतर काही क्षणातच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सफाई कर्मचाऱ्यांनी दोघा भामट्यांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर या दोघांसह रिक्षाला घेऊन गेले. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाच्यावतीने तक्रार न देण्यात आल्याने पोलिसांनाही पुढील कारवाई करता आली नाही. त्यामुळे ही बाब आता विशेष चर्चेची ठरत आहे.