नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – बनावट आदेशाच्या प्रती माहिती आयोगास सादर करून दिशाभूल व फसवणुक करण्याचा प्रयत्न करणा-या महिलेविरुध्द राज्य माहिती आयोगाच्या खंडपीठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. प्रथम अपिलामध्ये पारित केलेल्या आदेशात स्व हस्ताक्षरात खोटी माहिती लिहिणे तिच्या अंगलट आले आहे. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुनिता बापू ठाकरे (रा.खामगाव पो.पाचोराबारी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. खंडपीठाचे कक्ष अधिकारी चंद्रकांत कातकाडे यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केले आहे. खामगाव येथील संशयित महिलेने शहादा पंचायत समितीकडे माहितीच्या अधिकारात माहिती मागविली होती. वेळेत माहिती उपलब्ध न झाल्याने तिने प्रथम अपिलीय अधिकारी तथा विस्तार अधिकारी (ग्रा.पं.) यांच्याकडे अपिल दाखल केले होते. या अपिलाच्या सुनावणीस महिला अनुपस्थित राहिल्याने परस्पर निकाल देण्यात आला. यामुळे महिलेने राज्य माहिती आयोगाच्या नाशिक खंडपिठाकडे धाव घेत अपिल दाखल केले.
प्रथम अपिलामध्ये पारित केलेल्या आदेशात महिलेने खाडाखोड केल्याचे आढळून आले आहे. पंधरा दिवसात माहिती टपालाने देण्यात यावी असे स्व:ताच्या हस्ताक्षरात खोटी माहिती नमुद केली. खंडपीठाच्या पडताळणीत ही बाब निदर्शनास आल्याने बनावट आदेशाच्या प्रती आयोगास सादर करून दिशाभूल व फसवणुक करण्याचा तिने प्रयत्न केल्याने खंडपिठाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक साजीद मन्सुरी करीत आहेत.
…….