नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – थेट लग्नाच्या मिरवणुकीत पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेतल्यामुळे बोहल्यावर चढण्याऐवजी नवरदेवाला पोलिस स्टेशनची पायरी चढावी लागली. या नवरदेवाविरुद्ध नाशिकच्या उच्चशिक्षित २६ वर्षीय महिलेने तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
या महिलेने ही तक्रार राहाता येथील पोलिस स्थानकात केली होती. त्यात आमचे प्रेम संबंध असल्याचे म्हटले आहे. लग्नाचे आमिष दाखवून नवरदेवाने अनेकदा अत्याचार करुन फसवणूक केल्याचेही तक्रारीत आहे.नवरदेव हा नाशिकरोड येथे राहणारा असून तो राहाता येथील नववधूशी लग्न लावण्यासाठी आला होता. पण, पोलिसांनी त्याला थेट मिरवणूकीतून ताब्यात घेतल्यानंतर या नवरदेवाचे पितळ उघडे पडले व विवाह मोडला.
या सर्व घटनेमुळे पहिले तर वधु पक्षातील लोकांना पोलिसांनी का ताब्यात घेतले हे लक्षात आलेच नाही. एकीकडे लग्नाची सर्व तयारी झालेली असतांना झालेली घटना वधूपक्षाकडील मंडळींना धक्का देणारी ठरली. पण, नवरदेवाविरुध्द तक्रारीची माहिती मिळताच त्यांना फसवणुकीतून वाचल्याचे समाधान झाले. पोलिसांच्या या कारवाईमुळे हे होणारे लग्न चांगलेच चर्चेत आले.