नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करतांना पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. तसेच त्याबाबत गावपातळीवर देखील सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना राज्याचे बंदरे व खनिकर्म मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात आज पाणी टंचाई बाबत आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुसे बोलत होते. याबैठकीस नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे, उपवनसंरक्षक पंकज गर्ग, मालेगाव अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा जलसंधारण अधिकारी हरिभाऊ गीते, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी भीमराज दराडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, जिल्हा प्रशासन अधिकारी शाम गोसावी यांच्यासह संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, पाणी टंचाईचे नियोजन करतांना ग्रामपंचायत सदस्यांपासून तर खासदार या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेवून त्यांच्या माध्यमातून नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करण्यात यावे. त्याचप्रमाणे ज्या भागातील पाणी पुरवठा योजनांची कामे ७० ते ८० टक्क्यांपर्यंत पूर्ण झाली आहेत, ती कामे तातडीने पूर्ण करावीत. जेणे करून पाणी टंचाई काळात त्या पाणी पुरवठा योजनांचा नागरिकांना उपयोग होईल. त्यासाठी प्रांताधिकारी यांनी संबंधित विभागांच्या स्थानिक पातळीवर बैठका घेवून आवश्यकेनुसार नियोजन करण्यात यावे, अशा सूचना पालकमंत्री श्री. भुसे यांनी दिल्या आहेत.
पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यासोबतच वनक्षेत्रातील प्राण्यांना गरजेनुसार पाणी उपलब्ध होईल याकडेही लक्ष देण्यात यावेत. त्याचप्रमाणे टंचाई काळात गावपातळीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. यासाठी अधिकारी यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जावून पाहणी करावी. तसेच नादुरूस्त बोरवेलची कामे मिशन मोडवर घेवून तातडीने दुरूस्त करण्यात यावीत. पाण्याचा अपव्यव होणार नाही यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केल्यास त्याचा लाभ येणाऱ्या काळात होणार आहे, असेही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.
पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, पुरावठा विभागाने अन्नधान्याचे व पशुसंवर्धन विभागाने जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी नियोजन करावे. शिक्षण विभागाने येणाऱ्या काळातील उष्णतेची परिस्थिती लक्षात घेवून शाळांचा कालावधी व त्यांच्या वेळेचे नियोजन करणे गरजेचे आहे. तसेच संभाव्य टंचाई काळात कमी पाऊस झाल्यास किंवा उशीराने पाऊस आल्यास त्याकाळात कोणती पिके घेणे फायदेशीर ठरेल त्याअनुषंगाने कृषी विभागाने आराखडा तयार करावा. वाढत्या उष्णतेचा आरोग्यावर होणारा विपरित परिणाम लक्षात घेवून संभाव्य आजारांच्याबाबत आरोग्य विभागाने सतर्कता बाळगुन आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे. संभाव्य निर्माण होणाऱ्या टंचाईकडे सकारात्मकपणे पाहून टिमवर्कने विकासात्मक कामे करण्यावर भर देण्यात यावा, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
बैठकीच्या सुरूवातील नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्ये कार्यकारी अधिकारी डॉ. गुंडे व जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सागर शिंदे यांनी सादरीकरणाद्वारे पाणी टंचाईबाबत केलेल्या नियोजनाची माहिती सादर केली.
सुरगाणा तालुक्यात झालेल्या विषबाधा प्रकरणी त्या ठिकाणी काल्याचे कीर्तन होते. कीर्तनानंतर महाप्रसाद घेतल्याने काही लोकांना त्रास झाला. यातील काही जण बरे होऊन घरी देखील गेले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे. घाबरण्यासारखे काही नाही. आरोग्य उपचार योग्य पद्धतीने सुरू आहेत, असे भुसे यांनी स्पष्ट केले.
नाशिकमधील कोरोना रुग्ण आणि स्थितीबाबत पालकमंत्री म्हणाले की, नाशकात सद्यस्थितीत ८६ कोरोना रुग्ण आहेत. फक्त दोन रुग्ण दवाखान्यात आहेत. परिस्थिती पाहता घाबरण्यासारखे काही नाही. तरीही सर्वांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचे भुसे यांनी सांगितले.
Nashik City Water Cut Minister Dada Bhuse