नाशिक – जुलै महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला तरी अद्याप नाशकात जोरदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे गंगापूर धरण परिसरात पाण्याच्या पातळीत कुठलीही वाढ झालेली नाही. शिवाय दिवसेंदिवस धरणातील पाणी पातळी घटत आहे. गंगापूर धरण समुहातील सध्याचा साठा लक्षात घेता तो केवळ ४० दिवस पुरेल एवढाच आहे. तसेच, पाऊस नक्की कधी बरसेल याचाही अंदाज येत नाही. ही बाब लक्षात घेऊन महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला असून त्याची अंमलबजावणी तत्काळ सुरू होणार आहे. त्यामुळे आता दर गुरुवारी नाशिक शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे. यासंदर्भात महापालिकेने गेल्याच आठवड्यात संकेत दिले होते.