नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक शहरात वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. नाशिक पोलिसांच्या निष्क्रीयतेमुळे चोरट्यांचे फावत आहे. शहरात दररोज तब्बल दोन वाहने चोरीस जात आहेत. परिणामी, महिन्याकाठी ७५ वाहने चोरट्यांच्या हाती लागत आहेत. या तुलनेत पोलिसांच्या तपासाची गती अतिशय कमी आहे.
नाशिक शहरात जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात ३०४ वाहने लंपास झाली आहेत. तशी तक्रार शहराच्या विविध भागातील पोलिस स्टेशनकडे दाखल झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल याच काळात हे प्रमाण ३०४ एवढे होते. पोलिस कारवाई करीत नसल्याने चोरट्यांनी वाहनांकडे आपला होरा वळवला आहे. पोलिसांकडून वाहनांचा माग काढला जात नाही. अवघ्या १० टक्केच वाहने शोधण्यात पोलिस यशस्वी होत आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात पोलिसांनी अवघी २९ वाहनेच शोधून काढली आहेत.
दरम्यान, शहरात वेगवेगळ्या भागातून चारचाकीसह दुचाकी चोरीला गेल्याची घटना आताही घडली आहे. याप्रकरणी नाशिकरोड आणि पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पहिली घटना पंचवटीतील गणेशवाडी भागात घडली. दिनेश मुरलीधर बांदल (रा.जुना आडगावनाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बांदल गेल्या शनिवारी (दि.१०) गणेशवाडी भागातील आयुर्वेद हॉस्पिटल भागात गेले होते. हॉस्पिटल समोर पार्क केलेली त्यांची सीडी डॉन एमएच १५ बीएफ ७४०१ दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार वाघमारे करीत आहेत.
दुस-या घटनेत इरफान अहेसान फकिर (रा.मदार मज्जीदजवळ,मुमताजनगर वडाळागाव) यांची सुझूकी कंपनीची इको चारचाकी एमएच २१ व्ही २४७५ गेल्या शनिवारी (दि.१७) गोसावीवाडीतील चव्हाण गॅरजसमोरील मोकळया पटांगणात पार्क केलेली असतांना ती चोरट्यांनी चोरून नेली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.