पैसे न दिल्याने बेदम मारहाण
नाशिक – मद्यपान करण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने दुकलीने एकास बेदम मारहाण करीत जखमी केल्याची घटना पेठरोडवरील शनिमंदिर भागात घडली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीसांनी दोघाना अटक केली आहे.
संतोष रामू म्हस्के (२३) व राहूल कृष्णा राऊत (२१ रा.दोघे शनि मंदिरामागे,पेठरोड) अशी अटक केलेल्या संशयीतांची नावे आहेत. याप्रकरणी श्याम आण्णा पवार (रा.पवार चाळ, शनिमंदिरामागे) यांनी तक्रार दाखल केली आहे. पवार गुरूवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास आपल्या घरात असतांना दोघांनी त्यांना गाठले. पवार यांना घराबाहेर बोलावून घेत दारू सेवन करण्यासाठी पैश्यांची मागणी करण्यात आली. मात्र पवार यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने हा वाद झाला. संतप्त दोघा संशयीतांनी शिवीगाळ करीत त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेत विटा फेकून मारण्यात आल्या. तसेच एकाने धारदार शस्त्राने वार केल्याने पवार जखमी झाले असून अधिक तपास हवालदार शेळके करीत आहेत.
कारची काच फोडून बॅग लंपास
नाशिक – पार्क केलेली कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप असलेली बॅग चोरून नेल्याची घटना जिल्हापरिषद समोर घडली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भुषण विजय गडाख (रा.निर्मला कॉन्व्हेंट जवळ,गंगापूररोड) यांनी तक्रार दाखल केली आहे. गडाख गुरूवारी (दि.७) कामानिमित्त जिल्हापरिषद भागात गेले होते. बिर्ला हॉस्पिटल समोरील रस्त्यावर त्यांनी आपली इकोस्पोर्टस कार एमएच ०२ डीजी ४४२० पार्क केली असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी दरवाजाची काच फोडून चालकाच्या शिटाशेजारी ठेवलेली सुमारे २० हजार रूपये किमतीचा लॅपटॉप बॅगसह चोरून नेला. अधिक तपास हवालदार चौधरी करीत आहेत.
रथचक्र भागात घरफोडी
नाशिक – वर्दळीच्या रथचक्र भागातील बंगला फोडून चोरट्यांनी सुमारे दोन लाखाचा ऐवजावर डल्ला मारला. त्यात १५ हजाराच्या रोकडसह सोने चांदीच्या दागिण्यांचा समावेश आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई येथील अंचला दासगुप्ता यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. दासगुप्ता यांच्या बहिण शोभना अविनाश गाडगीळ यांचा रथचक्र सोसायटी जवळील सन्मित्र वसाहतीत बंगला आहे. अज्ञात चोरट्यांनी कुटूंबिय बाहेरगावी गेल्याची संधी साधत गच्चीचा लाकडी दरवाजा तोडून ही घरफोडी केली. २८ मार्च ते ७ आॅक्टोबर दरम्यान घरात शिरलेल्या चोरट्यांनी तळमजल्यावरील बेडरूमच्या कपाटातील रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे असा सुमारे १ लाख ९५ हजार रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक उघडे करीत आहेत.
पंचवटीत पाच जुगारी जेरबंद
नाशिक – इंद्रकुंड भागातील इमारतीवर जुगार खेळणाऱ्या पाच जुगारींना पोलीसांनी जेरबंद केले. संशयीत अंक आकड्यावर पैसे लावून मटका जुगार खेळत होते. त्यांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिलीप भाऊसाहेब सातपुते (रा.मोरेचाळ,नवनाथनगर),मनिष रामचंद्र परदेशी (रा.मखमलाबादरोड),शरद गंगाधर वायकंडे (रा.कोळीवाडा,गणेशवाडी),संजयकुमार भद्रीलाल पंडीत (रा.तेलंगवाडी,पेठरोड) व विनोद शिवाजी डांबरे (रा.धात्रक चाळ,मधूबन कॉलनी) अशी अटक केलेल्या संशयीत जुगारींची नावे आहे. गुरूवारी (दि.७) सायंकाळच्या सुमारास इंद्रकुंड भागातील रिध्दी सिध्दी टॉवर या इमारतीवर काही जण जुगार खेळत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकला असता संशयीत पोलीसांच्या जाळ््यात अडकले. अंक अकड्यावर पैसे लावून ते मटका जुगार खेळत होते. संशयीतांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले असून,पोलीस शिपाई श्रीकांत कर्पे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस नाईक भोईर करीत आहेत.
सातपूरला युवकाची आत्महत्या
नाशिक – औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर भागात राहणाºया ३८ वर्षीय एकाने गळफास लावून आत्महत्या केली. सदर व्यक्तीच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
कुंदन विरेंद्र सिंग (रा.सुनिल पार्क,आयटीआय कॉलनी) असे आत्महत्या करणाºया व्यक्तीचे नाव आहे. कुंदन सिंग यांनी गुरूवारी (दि.७) अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील पंख्याच्या अँगलला गळफास लावून घेतला होता. ही बाब निदर्शनास येताच कुटूंबिय आणि शेजाºयांनी त्यास तातडीने जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.
गोदावरीत बुडालेल्या युवकाचा मृतदेह सापडला
नाशिक – दुचाकी धुवत असतांना पुर पाण्यात वाहून गेलेल्या अल्पवयीन बालकाचा मृतदेह चार दिवसानंतर हाती लागला आहे. गंगावाडी स्मशानभूमी भागात मृतदेह पाण्यावर तरंगतांना मिळून आला असून याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
प्रथमेश पंडीत मोरे (१४ रा.रामनगर,मोरेमळा हनुमानवाडी) असे मृत बालकाचे नाव आहे. प्रथमेश मोरे गेल्या सोमवारी (दि.४) दुपारी गोदावरीचा पुर पाणी ओसरताच मोटार सायकल धुवून टाकण्यासाठी टाळकेश्वर मंदिर भागात गेला होता. नदीपात्राच्या काठावर दुचाकी उभी करून तो गाडी धुवत असतांना ही घटना घडली. नदीपात्रात पाणी घेण्यासाठी गेला असता तो पायघसरून पाण्यात पडला होता. ही बाब दुचाकी आढळून आल्याने निदर्शनास आली होती. जीवरक्षकांसह अग्निशमन दलाने सर्वत्र शोध घेवूनही तो मिळून आला नव्हता. गुरूवारी (दि.७) चौथ्या दिवसी त्याचा मृतदेह गंगावाडी भागातील स्मशानभुमी परिसरात पाण्यावर तरंगतांना मिळून आल्याने त्याच्या मृत्युचा उलगडा झाला. याप्रकरणी पंडीत मोरे यांनी दिलेल्या खबरीवरून आडगाव पोलीस ठाण्यात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास जमादार पाटील करीत आहेत.