नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – विनाहेल्मेट आणि ट्रिपलसिट प्रवास करणा-या बेशिस्त २७६ दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई करीत पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे दीड लाखाचा दंड वसूल केला. वाहतूक शाखेसह पोलिस ठाणे निहाय बुधवारी संपूर्ण शहरात नाकाबंदी करण्यात आली. त्यात ही कारवाई करण्यात आली.
बुधवारी सायंकाळी अचानक पोलिस दल रस्त्यावर उतरले. वाहतूक शाखेसह पोलिस ठाणेनिहाय नाकाबंदी करण्याचे फर्मान सुटल्याने सर्वत्र वाहन तपासणी करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या कारवाईत दुचाकीस्वारांना लक्ष करण्यात आल्याने विनाहेल्मेट आणि ट्रिपलसिट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाईस सामोरे जावे लागले.
या वाहनतपासणीत परिमंडळ एक मध्ये १२० तर परिमंडळ २ हद्दीत १५६ अश्या सुमारे २७६ बेशिस्त दुचाकीस्वारांकडून १ लाख ४४ हजार ७५० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून नागरीकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.