नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहराच्या अनेक भागात आज सकाळीच वाहतूक विस्कळीत झाल्याचे पहायला मिळाले. मुंबई-आग्रा महामार्गालगतच्या अनेक रस्त्यांसह शहरातील मुख्य रस्ते वाहनांच्या रांगांनी भरलेले होते. सकाळीच कार्यालय, शाळा, महाविद्यालय आणि कामाच्या ठिकाणी जाणाऱ्यांचे प्रचंड हाल झाले.
मुंबई-आग्रा महामार्गालगतचे सर्विहस रोड, इंदिरानगर बोगदा, लेखानगर, राणेनगर, मुंबई नाका, द्वारका अशा विविध भागांसह सीबीएस, अशोकस्तंभ, शरणपूर रोड अशा विविध भागात सकाळीच ९ ते १० वाजेच्या सुमारास वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या.
राज्य सरकारच्यावतीने आज, शनिवारी (१५ एप्रिल) शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदानावर होत आहे. या समारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह अनेक मंत्री, लोकप्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी शहरातील वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे. नाशिक शहर पोलिसांनी वाहतूक बदलाची अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे उद्या नागरिकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे. सकाळी सहा वाजेपासून ते कार्यक्रम संपेपर्यंत वाहतुकीतील हा बदल लागू असणार आहे. असे नाशिक पोलिसांनी सांगितले आहे.
या मार्गावर प्रवेश बंदी
मॅरेथॉन चौक ते गंगापूर नाका सिग्नल, गोल्डन जिम ते ठक्कर बंगला, जुना गंगापूर नाका सिग्नल ते अहिरराव फोटो स्टुडिओ या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
हा आहे पर्यायी मार्ग
गंगापूर रोडकडून अशोकस्तंभाकडे येणारी वाहने जुना गंगापूर नाका, चोपडा लॉन्स मार्गे मॅरेथॉन चौकात येऊन अशोकस्तंभाकडे जाऊ शकतील, तर अशोकस्तंभाकडून मॅरेथॉन चौकाकडे जाताना जुनी पंडित कॉलनी मार्गे राणे डेअरी व इतर ठिकाणी जाता येईल. गंगापूर रोडने जाणारी वाहने कॅनडा कॉर्नर, कॉलेज रोड मार्गे इतरत्र जाऊ शकतील.
शहराच्या ६ भागातून बसेसची सुविधा
‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम शनिवार १५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता डोंगरे वसतीगृह मैदानात होणार आहे. राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान (एनयूएलएम), पीएम स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आवास योजना, समाज कल्याण, महिला व बालकल्याण अशा महानगरपालिकेच्या विविध विभागातील लाभार्थ्यांना कार्यक्रमाच्या ठिकाणी आणण्यासाठी व कार्यक्रम झाल्यावर परत घेऊन जाण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन केले आहे. मनपाचे सहा विभाग मिळून सिटी लिंक बसेसचे एकूण ५८ पिकअप आणि ड्रॉप पॉईंट असणार आहेत.
शहर वाहतूक सेवा सिटीलिंकच्या एकूण ७५ बसेस धावणार आहेत. कार्यक्रम झाल्यावर त्याच बस मधून लाभार्थ्यांला परत सोडण्यात येणार आहे. प्रत्येक बससाठी दोन संपर्क प्रमुख असणार आहेत. बस क्रमांकसह संपर्क प्रमुखाचे नाव, मोबाईल नंबर बसवर असणार आहे. लाभार्थ्यांनी मनपाने दिलेल्या पिक अप पॉईंटवर १५ जुलै रोजी सकाळी ९ वाजता हजर राहावे, जेणेकरुन कार्यक्रमाच्या स्थळी वेळेत पोहचता येईल, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.