नाशिक – नाशिककरांनो, शहरात पुन्हा एकदा पोलिसांकडून वाहनांचे टोईंग सुरू होणार असले तरी घाबरुन जाण्याचे किंवा चिंतेचे काहीच कारण नाही. जर आपल्याकडे टू व्हिलर असेल तर तातडीने तुम्ही थ्री व्हिलर वाहन घेण्याचा विचार करा. कारण, ज्यांच्याकडे थ्री व्हिलर आहे त्यांच्यासाठी मोठी खुषखबर आहे.
येत्या काही दिवसात सुरू होणाऱ्या टोईंगमध्ये नाशिक शहराच्या कुठल्याही भागात केव्हाही तुम्ही थ्री व्हिलर कुठेही बिनदिक्कतपणे पार्किंग करु शकाल. टोईंगची व्हॅन तेथे आली तरी तुम्हाला धावपळ करण्याची गरज नाही. कारण, थ्री व्हिलरचे टोईंग होणारच नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असे का, तर त्याचे उत्तर आहे की, कंत्राटदाराला मिळणारे पैसे.
नाशिक शहर वाहतूक पोलिसांचा टोईंग कंत्राटदाराबरोबर जो करार आहे. त्यात टोईंगचे जे दर ठरले आहेत त्यानुसार, कंत्राटदार केवळ टू व्हिलर आणि फोर व्हिलरचेच टोईंग करेल. किंबहुना कंत्राटदाराला टू व्हिलरच्या टोईंगमध्येच ‘परवडणार’ आहे. कारण, एकाच वाहनात तो एकावेळी ३ ते ४ टू व्हिलरचे टोईंग करु शकणार आहे. त्यामुळे टोईंग सुरू झाले तरी त्याचे खरे लक्ष्य हे टू व्हिलरच असणार आहे. टू व्हिलरचे टोईंग केले तर कंत्राटदाराला ९० रुपये मिळतील आणि सरकारला २०० रुपये. म्हणजेच, टू व्हिलर धारकाला टोईंगपोटी २९० रुपये मोजावे लागणार आहेत. कंत्राटदाराने एकाचवेळी ३ टू व्हिलरचे टोईंग केले तर त्याला २७० रुपये मिळतील.
तर, फोर व्हिलर धारकांना कंत्राटदाराचे ३५० आणि सरकारचे २०० असे ५५० रुपये अदा करावे लागणार आहेत. विशेष म्हणजे, थ्री व्हिलरला मात्र बिनबोभाट कुठेही, केव्हाही आणि कसेही पार्किंग करण्याची मुभा मिळणार आहे. कारण, थ्री व्हिलरचे टोईंग केले तर कंत्राटदाराला अवघा १ रुपया मिळणार आहे तर सरकारला २०० रुपये. ज्या अर्थी कंत्राटदाराला १ रुपया मिळणार आहे, तेव्हा कंत्राटदार थ्री व्हिलर ऐवजी टू व्हिलर आणि फोर व्हिलरच्याच टोईंगला पसंती देणार आहे. त्यामुळे वेळ न दवडता थ्री व्हिलरचा विचार करा आणि नाशिक शहरात पार्किंगच्या टेन्शपासून मुक्त व्हा.
अधिक माहितीसाठी बघा हा तक्ता