नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात बुधवारी वेगवेगळया भागात राहणा-या तिघांनी आत्महत्या केल्याची घटना घडली. तिघांच्याही आत्महत्येचे कारण स्पष्ट होवू शकले नाही. याप्रकरणी अंबड, गंगापूर आणि सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पहिली घटना औद्योगिक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. मनोज तुकाराम निकम (४२ रा. माळी कॉलनी, वृंदावन गार्डनजवळ) यांनी गेल्या शनिवारी (दि.१०) रात्री अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरात स्वतःच्या अंगावर ज्वलनशिल पदार्थ टाकून पेटवून घेतले होते. या घटनेत ते गंभीर भाजल्याने कुटूंबियांनी त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले होते. बुधवारी उपचार सुरू असतांना डॉ.कल्पेश भोये यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार बेंडकुळे करीत आहेत
दुसरी घटना सिडकोतील लेखानगर भागात घडली. येथे राहणा-या सुरेखा अनिल पानवळ (५६ रा.श्रीराम संकुल,बडदेनगर) यांनी बुधवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील बेडरूममध्ये अज्ञात कारणातून पंख्याच्या हुकास साडी बांधून गळफास लावून घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मुलगा राहूल पानवळ यांनी खबर दिली. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.
तिसरी घटना संतकबीरनगर येथे घडली. उत्तम किरण कसबे (७० रा.समाज मंदिराजवळ,भोसला स्कुलमागे) यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास अज्ञात कारणातून आपल्या राहत्या घरातील हॉलमध्ये लोखंडी पाईपाला दोरी बांधून गळफास लावून घेतला होता. त्यात त्याचा मृत्यू झाला. याबाबत गोविंद साठे यांनी दिलेल्या खबरीवरून गंगापूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक पगार करीत आहेत. .