नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाघाडी येथील गावठी दारूच्या हातभट्या उदध्वस्त केल्या. या कारवाईत तीन दारू तस्करांना जेरबंद करुन कारसह सुमारे साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त केला. त्यात १ हजार ५७० लिटर गावठी दारूच्या साठ्याचा समावेश आहे. ही कारवाई एक्साईजच्या अ विभाग भरारी पथकाने केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेल्या माहितीनुसार गौरव रमेश पाटील, मनोज बापूराव पिंपळसे व हर्षल कैलास पाटील अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. तर, श्याम धनाजी शिंपी, महावीर अरूण कौलकर व कैलास विनायक पाटील आदी संशयित पसार झाले आहेत. शहरात पुन्हा एकदा गावठी दारूने तोंड वर काढल्याने उत्पादन शुल्क विभागाने मिशन वाघाडी हाती घेतले आहे. राजकारण्यांसह स्थानिकांचा विरोध लक्षात घेवून मंगळवारी अ विभागाने वाल्मिकनगर, संत गाडगे महाराज, कृष्ठधाम, शिशू विहार व छत्रपती संभाजीनगर रोड आदी भाग पिंजून काढत अनेक हातभट्या उध्वस्त केल्या. पंचवटी पोलिसांचा बंदोबस्त घेवून ही कारवाई करण्यात आली आहे.
या कारवाईत वरिल तिघा संशयितांना बेड्या ठोकण्यात आल्या असून,त्यांचे तीन साथीदार पोलिसांची चाहूल लागताच पसार झाले आहे. या कारवाईत सुमारे १ हजार ५७० लिटर गावठी दारूसह रसायन नष्ट करण्यात आले आहे. या ठिकाणी मद्याची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारी एमएच १५ एचवाय २५४८ या इको कारसह संशयितांचे मोबाईल, दारू गाळपासाठी लागणारे साहित्य असा ४ लाख ४७ हजार ८५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई अधिक्षक शशिकांत गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली अ विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर,दुय्यम निरीक्षक यशपाल पाटील,भावना भिरड,सहाय्यक दुय्यम निरीक्षक मायकल पंडीत,जवान विरेंद्र वाघ,राहूल जगताप,विजय पवार व मंगलसिंग जाधव आदींच्या पथकाने केली. या कारवाईसाठी ब विभागाचे निरीक्षक सुनिल देशमुख,क विभागाचे जी.पी.साबळे,नाशिक भरारी पथकाचे जयराम जाखेरे व विभागीय भरारी पथकाचे अरूण चव्हाण व त्यांच्या सहका-यांनी सहकार्य केले.