नाशिक – नाशिक शहरात येत्या सोमवारपासून (१५ नोव्हेंबर) महापालिकेच्यावतीने विशेष मोहिम हाती घेतली जाणार आहे. ही मोहिम तब्बल १० दिवस चालणार आहे. यात घरोघरी जाऊन महापालिकेचे कर्मचारी क्षयरोगाच्या रुग्णांचा शोध घेणार आहेत.
क्षयरोगाबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने क्षयरोग विभागामार्फत क्षयरुग्ण शोध मोहिम 15 ते 25 नोव्हेंबर 2021 या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांनी आपल्या घरी येणा-या आशा/प्रशिक्षित स्वयंसेवकांकडुन क्षयरोगाबाबत माहिती घेवुन लक्षणे असल्यास तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
नाशिक शहरातील विविध भागातील एकूण 2 लाख 80 हजार लोकसंख्येची घरोघरी जावुन तपासणी करण्यात येणार आहे. एकुण 140 पथकांव्दारे जोखमीच्या भागातील तयार केलेल्या कृती आराखडयानुसार दररोज 20 ते 30 घरांना प्रत्यक्ष गृहभेट देवुन क्षयरुग्ण शोध घेतला जाणार आहे. क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांना मोफत औषधोपचार तसेच उपचार सुरु असेपर्यंत दरमहा रु.500 शासनामार्फत रुग्णाच्या बँक खात्यामध्ये पोषण आहार भत्ता म्हणुन अदा करण्यात येते.
क्षयरोगाची लक्षणे अशी
नाशिक महापालिकेच्या शहर क्षयरोग अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दोन आठवडे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीचा खोकला तसेच ताप असणे, वजनात लक्षणीय घट होणे, भुक न लागणे, मानेवर गाठ येणे, चालताना धाप लागणे, थुंकी / खोकताना रक्त पडणे अशा प्रकारची लक्षणे असल्यास व त्यापैकी कोणतेही एक लक्षण असल्यास असे रुग्ण संशयीत समजावे व त्यांनी क्षयरोगाची चाचणी करुन घ्यावी. यासाठी त्या रुग्णाचे दोन थुंकी नमुने घेण्यात येतील तसेच एक्स रे काढण्यात येईल.