नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूरमधील अशोकनगर भागात तरुण व्यावसायिकाने दुकानातच गळफास घेतल्याची बाब समोर आली आहे. अशोकनगर येथील पोलिस चौकीच्या समोरच भरकादेवी आईस्क्रीम सेंटर आहे. आणि याच दुकानात व्यावसायिकाने गळफास घेतला आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदिप दिलीप पवार (वय २२ वर्षे) असे मृत व्यावसायिकाचे नाव आहे. त्याने आपल्याच दुकानात गळफास लावून घेत आत्महत्या केली. पवार हे ध्रुवनगर, मोतीवाला कॉलेज समोर या भागाचे रहिवासी आहेत. त्यांनी अशोक नगर पोलिस चौकीच्या समोरच भरकादेवी आईस्क्रीम सेंटर सुरु केले होते. या सेंटरला प्रतिसादही चांगला मिळत होता. तसेच, परिसरातील व्यावसायिक वर्गामध्येही त्यांची चागली प्रतिमा होती.
मृत पवार यांनी रविवारी सायंकाळच्या सुमारास छताच्या लोखंडी अॅगलला साडी बांधून गळफास लावून घेतला. ही बाब निदर्शनास येताच चुलत भाऊ राजेंद्र पवार यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय सूत्रांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत. पवार यांनी गळफास का घेतला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. त्यांनी काही चिठ्ठी लिहून ठेवलेली आहे का यासह अन्य बाबींचा तपास पोलिस करीत आहेत.