नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर परिसरात सोमवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला. एका अपघातात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी मयुर काळे (वय ४६, रा. सिडको) यांचा मृत्यू झाला आहे. तर दुस-या अपघातात सातपूर श्रमिक नगर येथे राहणारे रामकुमार सिंह यांचा मृत्यू झाला.
या अपघातातील पहिली घटना सातपूर त्र्यंबक रोड येथील सकाळ सर्कल जवळ घडली आहे. यात महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी मयुर काळे (वय ४६, रा. सिडको) यांचा मृत्यू झाला आहे. काळे हे रविवारी रात्री (दि.२७) रात्री दहा वाजता आपल्या वॅगनार (एम एच १५ जे डी ०३६६) या कारने सिडको येथे आपल्या घरी चालले होते. दरम्यान, सकाळ सर्कल येथील अग्निशमन केंद्रासमोर ते आले. आणि अचानक त्यांचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर धडकली. त्यात काळे हे गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी दवाखान्यात दाखल केले असता सोमवारी सकाळी उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दुसरी घटना अंबड लिंक रोड येथे घडली आहे. सातपूर श्रमिक नगर येथे राहणारे रामकुमार सिंह हे सोमवारी सकाळी आठ वाजेच्या दरम्यान सातपूरहुन अंबड लिंक रोडमार्गे अंबड येथे कामावर जात होते. दरम्यान, लिंकरोडवरील रस्त्यावर असलेला खड्डा चुकविताना दुचाकी आयशर गाडी खाली आल्याने ते गंभीर जखमी झाले होते. उपचारार्थ दवाखान्यात दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले.
दरम्यान, सातपूर परिसरात रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. मात्र वरवर खडी मुरूम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे. खडी पसरून रस्त्यावर गाडी चालवितना दुचाकी घसरण्याने अनेक अपघात होत आहेत. वरवर खडी माती टाकून खड्डा न बुजवता योग्य डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिक करत आहे.
Nashik City Satpur Road Accident 2 Deaths