नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीत बेकायदापणे शिरून टोळक्याने धुडघूस घातल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत सुरक्षा रक्षकांचे मोबाईल जप्त करीत टोळक्याने कंपनी मालकासह महिला कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. तसेच तोडफोड करीत कंपनीतील मशनिरी पळवून नेली असून, याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरूध्द जबरीचोरी, विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केसरसिंग शेखावत (३०), रोहित राजेश गोरण (२८), रितेश राकेश बुरट (२५), पंकज मदनलाल लोट (३२), सुरज शंभुजी टाक (३२), दिगविजय गोवर्धनसिंग (३८) व अजय इंटरलालजी लोट (३६) अशी कारखान्यात धुडघूस घालणा-या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी भाऊसाहेब ठाणसिंग गिरासे (रा. वडाळा पाथर्डी रोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. गिरासे यांचा सातपूर एमआयडीसीतील सुनिल ट्रान्सपोर्ट पाठीमागे हर्शिता इलेक्ट्रीकल्स व केबीबी नावाचा कारखाना आहे. गुरूवारी (दि.१५) रात्री गिरासे आपल्या कारखान्यात असतांना ही घटना घडली.
संशयित टोळक्याने कंपनीच्या सुरक्षा रक्षकांना दमदाटी व धक्काबुक्की करून बळजबरीने मोबाईल काढून घेत हे कृत्य केले. बेकायदा कारखान्यात शिरलेल्या टोळक्याने कुठलेही कारण नसतांना मालक गिरासे व महिला कामगारांना लक्ष करीत थेट मारहाण सुरू केले. या घटनेत महिलांचा विनयभंग करण्यात आला. तसेच शिवीगाळ करीत टोळक्याने कारखान्यात तोडफोड करून मशनरीचेही नुकसान केले. यावेळी संशयितांनी मशिनरी व अन्य साहित्य घेवून पोबारा केला असून, ही घटना आर्थिक वादातून झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अधिक तपास उपनिरीक्षक उबाळे करीत आहेत.