नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गावर द्वारका उड्डाणपुल येथे दुचाकी आणि कंटेनर यांचा अपघात झाला आहे. या अपघातात एक तरुण ठार झाला असून दुसरा गंभीर जखमी आहे. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नाशिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश कैलास कोतकर (रा. पिंपळगाव बसवंत) असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाशच्या आईवर त्र्यंबकरोडवरील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. आता आईला बरे वाटत असल्याने आज डिस्चार्ज देण्यात येणार होता. त्यामुळे आकाश हा आपल्या मित्रासमवेत पिंपळगाव बसवंत येथून दुचाकीने नाशिककडे येत होता. मुंबई-आग्रा महामार्गावरील उड्डाणपुलावरुन हे दोघे दुचाकीने नाशिक शहरात आले. त्याचवेळी द्वारका चौकाजवळील ट्रॅक्टर हाऊस येथे त्यांच्या दुचाकीने कंटेरनला जोरदार धडक दिली. हा कंटेनर उड्डाणपुलावर उभा होता. आकाश आणि त्याच्या मित्राला ही बाब लक्षात आली नाही. या गंभीर अपघातात आकाश आणि त्याचा मित्र हे दोन्ही गंभीर जखमी झाले.
ही बाब लक्षात येताच तातडीने या दोघांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी आकाश याला मृत घोषित केले. तर, त्याच्या मित्राची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.