नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सातपूर-अंबड लिंक रोडवर आज सकाळी झालेल्या अपघातात एक विद्यार्थी जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर झाले आहेत. ज्योती फार्म समोर तीन शाळकरी मुले मोटरसायकलने क्लासला जात होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या अपघातात सार्थक दामू राहाणे हा जागीच ठार झाला तर त्याचे दोन मित्र योगेश केणे, भावेश केणे हे गंभीर जखमी झाले.
सातपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी साडे सहा वाजता हा अपघात झाला. अंबड लिंक रोडवरील जाधव संकुल मधील राहणारे योगेश केणे, भावेश केणे व या दोन्ही भावांचा मित्र सार्थक दामू राहाणे हे तिन्ही मोटरसायकलवरून सातपूर कॉलनीत क्लासला जात होते. एम्पायर हॉटेल समोर अज्ञात वाहानाने मोटारसायकलला कट मारला. त्यामुळे मोटरसायकल दुभाजकावर धडकली. यात सार्थक राहाणे हा जागीच ठार झाला तर दोन्ही केणे बंधू गंभीर जखमी झाले. औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये पहिली शिफ्टसाठी जाणाऱ्या कामगारांनी हा अपघात पाहिला. त्यांनी त्वरीत धाव घेत मदतकार्य केले. तसेच पोलिसांना कळवले. सातपूर पोलिसांनी जखमींना उपचारासाठी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले.
दुस-या घटनेत दोन्ही मोटरसायकल धडकल्या
दुस-या एका घटनेत सातपूर – त्रंबक रोडवरील महापालिकाच्या सातपूर विभागीय कार्यालया समोरही अपघात झाला. या अपघातात दोन मोटरसायकल समोरासमोर धडकल्या. यात दोन्ही चालक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात सातपूर राजवाडा येथील किरण नवनीत काळे याला उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे.