नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – धनदाई लॉन्स भागात भरधाव दुचाकीने अॅटोरिक्षास धडक दिल्याची घटना झाली होती. या अपघातात पलटी होवून एका महिला प्रवाश्याचा मृत्यू झाला तर चालक जखमी होता. याप्रकरणी दुचाकीस्वाराविरूध्द पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोहर पंढरीनाथ बोरसे (३० रा.शिंदेनगर, मखमलाबादरोड) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित दुचाकीस्वाराचे नाव आहे. पंचवटीतील धनदाई लॉन्स भागात गेल्या बुधवारी (दि.२१) हा अपघात झाला होता. मोरे मळा चौफुली कडून चोपडा लॉन्सच्या दिशेने जाणा-या एमएच १५ एफ यू २९३५ या अॅटोरिक्षास समोरून विरूध्द दिशेने भरधाव येणा-या एमएच ४१ बीए ६१० या दुचाकीने धडक दिली होती.
या अपघातात दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात रिक्षा पलटी झाल्याने मंदाबाई बन्सीलाल करपे (६५ रा.मखमलाबाद) या प्रवासी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर चालक मोहन भास्कर क्षिरसागर (५५ रा.पेठरोड) हे जखमी झाले होते. तसेच या घटनेत दोन्ही वाहनांचेही मोठे नुकसान झाले. तपासा अंती पोलिस नाईक अमोल काळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून दुचाकीस्वार बोरसे याच्याविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक खैरणार करीत आहेत.
अशोकनगरला दुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू
औद्योगिक वसाहतीतील अशोकनगर भागात भरधाव दुचाकी घसरल्याने ५६ वर्षीय चालकाचा मृत्यू झाला. हारेंद्र रामदेव पंडीत (रा.महादेववाडी, सातपूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हारेंद्र रामदेव पंडीत (रा.महादेववाडी,सातपूर) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पंडीत शुक्रवारी (दि.२३) सकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीवर श्रमिकनगरकडून अशोकनगरच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. साईनाथ हॉस्पिटल समोर भरधाव दुचाकी घसरल्याने ते गंभीर जखमी झाले होते. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ धाडीवाल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला अधिक तपास हवालदार आहेर करीत आहेत.