नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – श्रध्दा लॉन्स परिसरात भरधाव अॅटोरिक्षा पलटी झाल्याने ६२ वर्षीय वृध्द प्रवासी महिला ठार झाली. मंदाबाई बन्सीलाल कर्पे (रा. क्रांतीनग,र मखमलाबाद नाका) असे मृत प्रवासी महिलेचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
कर्पे या बुधवारी (दि.२१) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मोरे मळयातून श्रध्दा लॉन्सच्या दिशेने अॅटोरिक्षातून प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. श्रध्दा लॉन्स समोर अचानक विरूद्ध दिशेने दुचाकी आल्याने अॅटोरिक्षा पलटी झाली होती. या घटनेत कर्पे यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असतांना डॉ.स्वप्निल जगदाळे यांनी त्यांना मृत घोषित केले. अधिक तपास पोलिस नाईक काळे करीत आहेत.
मखमलाबादला भरदिवसा घरातून चोरी
मखमलाबाद नाका भागात भरदिवसा घरात शिरून चोरट्यांनी रोकडसह दागिणे आणि मोबाईल लंपास केले. या घटनेत सुमारे दीड लाखाच्या ऐवजावर चोरट्यांनी डल्ला मारला असून याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेंद्र पृथ्वीराज ललवाणी (रा.ललवाणी सदन,मखमलाबाद नाका) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे.
ललवाणी कुटुंबिय बुधवारी (दि.२१) अल्पशा कामानिमित्त घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या उघड्या घरात शिरून कपाटातील सोन्याचांदीचे दागिणे,रोकड व एक मोबाईल असा सुमारे १ लाख ५४ हजार १०० रूपयांचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक बावा करीत आहेत.