नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील जत्रा हॉटेल चौकात भरधाव डम्परने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बबन राजाराम बोरस्ते (४५ रा.साकोरे मिग ता.निफाड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात डम्पर चालकाविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोरस्ते बुधवारी (दि.१४) महामार्गाच्या सर्व्हीसरोडने नाशिककडून ओझरच्या दिशेने आपल्या एमएच १५ एचएस ७३६५ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. पाठीमागून भरधाव येणा-या एमएच १५ एचएच २५४५ या सोळा टायरच्या डम्परने दुचाकीस धडक दिली होती. डम्परचालकाचा आपल्या वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला होता.
या अपघातात बोरस्ते गंभीर जखमी झाले होते. डोक्यास वर्मी मार लागल्याने त्यांना तात्काळ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत हवालदार अशोक बस्ते यांनी दिलेल्या तक्रारीवरून डम्पर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.