नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. दोन्ही घटनांप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. या अपघातात एका बस प्रवाशाचा समावेश आहे. तर, रस्ता ओलांडतांना हायवा ट्रकने धडक दिल्याने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला अपघात जत्रा हॉटेल भागात झाला. बबन राजाराम बोरस्ते (४५ रा.साकोरा मिग,ता.निफाड) हे बुधवारी आपल्या मुलीस घेण्यासाठी जत्रा हॉटेल भागात आले होते. एसबीआय एटीएम समोर ते महामार्ग ओलांडत असतांना हा अपघात झाला. मुलीस घेण्यासाठी ते एटीएमच्या दिशेने पायी जात होते. सर्व्हीसरोड ओलांडत असतांना भरधाव हायवा मालट्रकने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे दाखल करण्यात आले होते. रात्री उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला. याबाबत महेश सोनवणे यांनी खबर दिली आहे.
दुसरा अपघात औरंगाबाद रोडवर झाला. येथील रविंद्र किसन पेखळे हे बुधवारी शहरात आले होते. सिटी लिंकबसने ते सायंकाळच्या सुमारास घराकडे परतत असतांना हा अपघात झाला. ओढागाव येथील थांब्यावर ते बसमधून उतरत असतांना औरंगाबाद रोडने नाशिककडून निफाडच्या दिशेने भरधाव जाणा-या मालवाहू पिकअपने त्यांना धडक दिली. या अपघातात त्यांच्या डोक्यास आणि पायास गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत बबन पवार यांनी खबर दिली. दोन्ही घटनांप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात वेगवेगळया मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. अधिक तपास हवालदार राजूळे व देवरे करीत आहेत.