नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सारडा सर्कल भागात भरधाव अॅटोरिक्षाने दिलेल्या धडकेत ५५ वर्षीय सायकलस्वार ठार झाल्याची घटना घडली. इम्तियाज मेहमुद पठाण (रा.सादिकनगर,वडाळागाव) असे मृत सायकलस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
पठाण मंगळवारी (दि.६) रात्री सायकलने सारडा सर्कल भागातून आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. परिसरातील शहा हॉस्पिटल समोर पाठीमागून भरधाव आलेल्या अॅटोरिक्षाने सायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात पठाण गंभीर जखमी झाले होते.
त्यांना नजीकच्या शहा हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते. दुस-या दिवशी त्यांना अधिक उपचारार्थ जिल्हा रूग्णालयात हलविले असता डॉ.राम पाटील यांनी उपचारापूर्वी मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार बोळे करीत आहेत.