नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रस्त्यात पडलेल्या पेवर ब्लॅाकवर जावून आदळल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या काम सुरु आहे. या ठिकाणी ही घटना घडली. निलेश सुभाष मराठे (२५ रा.श्रीकृष्ण अपार्टमेंट, गणेशवाडी अमरधामरोड) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मराठे बुधवारी (दि.२५) रामवाडी कडून गंगापूररोडच्या दिशेने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. चोपडा लॉन्स जवळ गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्याचे काम सुरू असून त्यामुळे या ठिकाणी एकेरी वाहतूक करण्यात आली आहे. मात्र बांधकामाच्या साहित्यासह दगडधोंडे या एकेरी मार्गावर पडलेले असल्याने हा अपघात झाला. या मार्गावरील खड्डे बुजण्यासाठी टाकलेला फ्लेवर ब्लॉकवरून दुचाकी घसरल्याने मराठे हा तरूण पडला होता. या घटनेत त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने १०८ अॅम्ब्युलन्सने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. मात्र अॅम्ब्युलन्सवरील डॉक्टर ललित महाले यांनी त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय सुत्रांनी उपचारापूर्वी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास पोलिस नाईक जाधव करीत आहेत.
द्वारकेवर दुचाकीस्वाराचा मृत्यू
व्दारका परिसरातील ट्रॅक्टर हाऊस जवळ भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत सायकलस्वार महिला ठार झाली. आरती शिवाजी सातपुते (५२ रा.निर्मण आशियाना सोसा.द्वारका) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. सातपुते या मंगळवारी (दि.२५) सायकलवर महामार्ग ओलांडत असतांना हा अपघात झाला. ट्रॅक्टर हाऊस समोरील चौकात भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिल्याने त्या गंभीर जखमी झाल्या होत्या.
मुलगा सुनिल सातपुते यांनी तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता डॉ. कश्यप मोकाशी यांनी त्यांना उपचारापूर्वीच तपासून मृत घोषीत केले. याबाबत हवालदार हरिश्चंद्र सोनवणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिस दप्तरी अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक तोंडे करीत आहेत.