नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कलानगर ते वडाळा दरम्यान भरधाव वेगातील चारचाकीने धडक दिल्याने सायकलस्वार शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. धर्मेद्र प्रकाश बिशी (१७ रा.पदमा अपा.बापू बंगल्याजवळ) असे मृत मुलाचे नाव आहे. याप्रकरणी चारचाकी चालकाविरूधात इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर बाळासाहेब कर्डीले असे संशयित चारचाकी चालकाचे नाव आहे.
याप्रकरणी हवालदार किशोर खरोटे यांनी तक्रार दाखल केली आहे. इंदिरानगर परिसरातील धर्मेद्र बिशी हा शाळकरी मुलगा गेल्या मंगळवारी (दि.११) सकाळी कलानगरकडून वडाळाच्या दिशेने आपल्या सायकलवरून जात असतांना हा अपघात झाला होता. वडाळारोडने भरधाव जाणा-या संशयिताच्या चारचाकीने सायकलीला धडक दिली होती. या अपघातात धर्मेंद्र बिशी हा शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला होता. सोमवारी (दि.१७) उपचार सुरू असतांना त्याचा मृत्यू झाला. अधिक तपास जमादार साळी करीत आहेत.
दुचाकी घसरल्याने चालक ठार
त्र्यंबकरोडवर भरधाव दुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू झाला. जखमीवर आडगाव मेडिकल कॉलेज येथे उपचार सुरू होते. याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पंकज रामधारी प्रसाद (३० रा.मोदकेश्वर नगर,कामटवाडा) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.
पंकज प्रसाद हा युवक रविवारी (दि.१६) रात्री त्र्यंबकरोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला होता. पपया नर्सरी भागात भरधाव दुचाकी घसरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. दिपक मोंढे यांनी त्यास तात्काळ जिल्हारूग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर कुटुंबियांनी त्यास अधिक उपचारार्थ आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे हलविले होते. मध्यरात्री उपचार सुरू असतांना डॉय संजय मानेकर यांनी त्यास मृत घोषीत केले. अधिक तपास हवालदार मुसळे करीत आहेत.