नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला. त्यात एका महिलेचा समावेश आहे. याप्रकरणी सातपूर, मुंबईनाका आणि आडगाव पोलिस ठाण्यात एक अपघाताचा तर दोन मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहिला अपघात महामार्गावरील जत्रा हॉटेल भागात झाला. नंदा मच्छीद्रनाथ चौरे (३५ रा.संतकृपा अपा.श्रीरामनगर) या बुधवारी (दि.२८) सकाळी अकराच्या सुमारास परिसरातील महाराष्ट्र बँकेपाठीमागील रस्त्याने पायी जात असतांना हा अपघात झाला. एम.के.बिअर शॉप समोरून त्या पायी जात असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. कुटूंबियांनी त्यांना नजीकच्या लोकमान्य हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.ओमकार गवळी यांनी त्यांना मृत घोषीत केले. याबाबत आडगाव पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
दुस-या अपघातात हरेंद्र रामदेव पंडीत (५० रा.अशोक विहार अपा.श्रमिकनगर) हे गेल्या बुधवारी (दि.१४) रात्री पुतण्या शिवम पंडीत याच्या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना ही घटना घडला. डबलसिट प्रवास करीत असतांना हरेंद्र पंडीत यांचा दुचाकीच्या फुटरेसवरील पाय घसरल्याने ते जमिनीवर कोसळले होते. या घटनेत गंभीर दुखापत झाल्याने त्यांना नजीकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रक्रणी हवालदार ए.एम.मुसळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुतण्या शिवम याच्या विरोधात सातपूर पोलिस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.
तिसरा अपघात गोविंदनगर भागात झाला. मधुकर कारभारी गांगुर्डे (५० रा.नागसेननगर,पिरबाबाजवळ वडाळानाका) हे रविवारी (दि.२५) सायंकाळच्या सुमारास आपल्या दुचाकीने इंदिरानगर बोगद्याकडून मुंबईनाक्याच्या दिशेने प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. सत्यम स्विट दुकानासमोर पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात चारचाकीने दुचाकीस धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले होते. नजीकच्या रूग्णालयात प्रथमोपचार करून कुटूंबियांनी त्यांना आडगाव येथील मेडिकल कॉलेज येथे हलविले असता बुधवारी रात्री डॉ.कश्चेपनाझ मोकाशी यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक सुनिल बहिरम करीत आहेत.