नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी रस्त्यालगत चार चाकी वाहनाच्या झालेल्या अपघातात एक आठ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना काल सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. जोया सलीम शेख (वय वर्षे ८) असे या चिमुकलीचे नाव आहे. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, ही धक्कादायक घटना पंचवटी परिसरात असलेल्या दिंडोरी रोडवरील अवधूतवाडी रस्त्यालगत झाली. जोया सलीम शेख या चिमुरडीचा चारचाकी वाहनाखाली येत अपघात झाला. जोया हिच्या डोक्यावरून गाडी गेल्याने ती गंभीर जखमी झाली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात मोठा जमाव झाला होता. चिमुकलीच्या जाण्याने तेथील जमाव संतप्त होत, वाहनाची तोडफोड करीत चालकाला मारहाण केली. अपघातानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. गर्दीमुळे काही काळ दिंडोरी रोडवरील वाहतूक खोळंबली होती.
अवधूतवाडी ते मायको दवाखाना या परिसरात अपघात झाल्यानंतर जवळपास पाचशे ते सहाशे जणांचा जमाव जमला होता. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. यावेळी जमलेली गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी अती शीघ्र दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते. याप्रकरणी जोयाच्या नातेवाईकांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी वाहनचालकाला ताब्यात घेतले आहे.
Nashik City Road Accident Child Girl Death