नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात अपघातांची मालिका सुरू असून महामार्गावर वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांमध्ये दाम्पत्यासह दुचाकीस्वार जखमी झाला. या घटनेत वाहनांचेही मोठे नुकसान झाले असून याप्रकरणी मुंबईनाका आणि इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कारच्या धडकेत दाम्पत्य जखमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिंगाडा तलाव भागात राहणारे महेंद्र आहेर व पत्नी मंगल आहेर हे दांम्पत्या सोमवारी (दि.२३) गोविंदनगर भागात गेले होते. सायंकाळच्या सुमारास आहेर दांम्पत्य एमएच १५ बीजी ६०७३ या आपल्या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. इंदिरानगर बोगद्याकडून सिटी सेंटर मॉलच्या दिशेने दांम्पत्य प्रवास करीत असतांना मनोहर गार्डन भागात पाठीमागून भरधाव आलेल्या एमएच ०२ बीआर २००५ या बीएमडब्ल्यू कारने दुचाकीस जोरदार धडक दिली. या अपघातात आहेर दांम्पत्य गंभीर जखमी झाले असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी आहेर यांचे भाऊ राजेंद्र आहेर यांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबईनाका पोलिस ठाण्यात कारचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.
दुचाकीची दुचाकीस धडक
दुसरा अपघात पाथर्डीफाटा भागात झाला. घनश्याम गोरख जाधव (२७ रा.दामोदरनगर,पाथर्डीफाटा) या युवकाने तक्रार दाखल केली आहे. जाधव सोमवारी (दि.२३) रात्रीच्या सुमारास बहिणीस सोबत घेवून एमएच १५ डीई ५०९६ या दुचाकीवर प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. दोघे बहिण भाऊ आयोध्या कॉलनीतील भाजी बाजार परिसरातून आपल्या दुचाकीवर डबलसिट प्रवास करीत असतांना साई मंदिर भागात समोरून भरधाव आलेल्या एमएच १५ ईडी १०२७ या दुचाकीने जाधव यांच्या दुचाकीस जोरदार धडक दिली. सदर दुचाकीवरील चालक हा मद्याच्या नशेत असल्याने हा अपघात झाला. दोन दुचाकींमध्ये झालेल्या या अपघातात जाधव जखमी झाले असून त्यांच्या दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात आकाश नामदेव नंद (रा.पाथर्डी फाटा) या मोटारसायकलस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.
Nashik City Road Accident 3 Injured Crime