नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात वेगवेगळ्या भागात रस्ते अपघाताच्या तीन घटना घडल्या आहेत. यात एक दुचाकीस्वार ठार झाला तर महिलेसह एक दहा वर्षीय बालिका जखमी झाली. याप्रकरणी अंबड व मुंबईनाका पोलिस ठाण्यात विविध वाहनांवरील चालकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पहिल्या घटनेत मेघराज रंभाजी आहिरे (३५ रा.जाधव संकुल,चुंचाळे शिवार) शनिवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास आपल्या दुचाकीने अंबड गावातून आपल्या घराकडे जात असतांना हा अपघात झाला. सातपूर रोडवरील अब्दूल्ला टेंडर्स समोर पाठीमागून भरधाव आलेल्या चारचाकीने दुचाकीला कट मारला. या अपघातात आहिरे दुचाकीवरून पडल्याने ते चारचाकीच्या पाठीमागील चाकाखाली आले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. चारचाकी चालक आपल्या वाहनासह पसार झाला असून याप्रकरणी पोलिस कर्मचारी सोमनाथ झोले यांनी अंबड पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
दुसरा अपघात सिडकोतील त्रिमुर्ती चौक भागात झाला. अरूणाबाई काशिनाथ पवार – पाटील (६२ रा.आर्वी धाडरे ता.जि.धुळे) या गेल्या रविवारी (दि.९) रात्री जीएसटी भवन परिसरातील युनियन बँके समोर रस्ता ओलांडत होत्या. त्याचवेळी त्रिमुर्ती चौकाकडून उत्तमनगरच्या दिशेने भरधाव जाणा-या एमएच १९ डीसी ९५०४ या दुचाकीने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात पाटील जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक पंकज शिरवले यांनी तक्रार दिली आहे. या दोन्ही गुन्ह्याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात चारचाकी चालक आणि मनोज निंबा महाजन (रा.दरेगाव लोंढे ता.चाळीसगाव) या दुचाकीस्वाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास अनुक्रमे उपनिरीक्षक पाडेकर व हवालदार राऊत करीत आहेत.
तिसरा अपघात विनयनगर येथे झाला. श्रध्दा उर्फ स्वरा संतोष आवटी (१० रा.सप्तशृंगी मंदिरासमोर,विनयनगर) ही बालिका गेल्या शनिवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास विनयनगर कडून सप्तशृंगी मंदिराच्या दिशेने आपल्या घराकडे कॉलनीरोडने पायी जात असतांना भरधाव आलेल्या स्कुल बसने एमएच १५ जीव्ही ३८४४ तिला धडक दिली. या अपघातात श्रध्दा गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिस नाईक सुनिल बहिरम यांनी दिलेल्या तक्रारीवरून बसचालक योगेश अहिरराव यांच्याविरूध्द मुंबईनाका पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार गाढवे करीत आहेत.