नाशिक – शहर व परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात रस्त्याने पायी जाणारे दोन तरूण ठार झाले. याप्रकरणी आडगाव आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत रस्ता ओलांडणारा २३ वर्षीय तरूण ठार झाला. हा अपघात महामार्गावरील गुरूनानक पेट्रोल पंपा समोर झाला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश आनंद गायकर (वय २३) हा तरूण मंगळवारी (दि.२८) रात्री महामार्ग ओलांडत असतांना हा अपघात झाला. आडगाव शिवारातील गुरूनानाक पेट्रोल पंपा समोर आकाश पायी रस्ता ओलांडत असतांना नाशिक कडून ओझरच्या दिशेने भरधाव जाणाºया अज्ञात वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. या अपघातात आकाश यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यु झाला. अधिक तपास उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत. याप्रकरणी वडिल आनंद तुकाराम गायकर (वय ५०, कोर्णाकनगर श्रीरामनगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक सुभाष जाधव करीत आहेत.
दुसरा अपघात पेठरोडवर झाला. निलेश कुबेर दिवेकर (२६ रा.पिंगळे गल्ली मखमलाबाद ) हा युवक बुधवारी (दि.२९) रात्री पेठरोडवरील राहू हॉटेल समोर रस्त्याने पायी जात असतांना ही घटना घडली. चौफुलीवर तो रस्ता ओलांडत असतांना नाशिककडून पेठच्या दिशेने भरधाव जाणाºया अज्ञात आयशर ट्रकने त्यास धडक दिली. या अपघातात त्यास गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यु झाला. याप्रकरणी राजेश शिरसाठ (रा.माळी गल्ली,म.बाद) यांनी दिलेल्या तक्रारीवरून म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास उपनिरीक्षक चतुर करीत आहेत.
काठे गल्लीत साठ हजाराची घरफोडी
नाशिक – द्वारका परिसरातील काठे गल्लीत नुकत्याच झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी ५८ हजाराच्या ऐवजावर डल्ला मारला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल धर्मराज जाधव (वय ६२,सिध्द गौतम हौसींग सोसायटी) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेली माहीती अशी तक्रारदार धर्मराज जाधव यांचे कुटुंब जउळके (ता.दिंडोरी) येथे त्यांच्या शेतीच्या कामासाठी गेले होते. दि. २० ते ३० सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराच्या दरवाजाच्या कडीचे कोयंडा तोडून घरातील कपाटात ठेवलेले ५ ग्रॅम वजनाच्या दोन सोन्याच्या अंगठया, दोन ग्रॅमची कानातील रिंग, ४७ हजाराची रोकड असा सुमारे ५८ हजाराचा ऐवज चोरून नेला. अधिक तपास उपनिरीक्षक भालेराव करीत आहेत.