नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– त्र्यंबकनाका भागातील राजदूत हॉटेल समोर भरधाव दुचाकी एसटी बसवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला आहे. शुभम संतोष कोकाटे (वय २१, रा. राणा प्रताप चौक, सिडको) आणि शुभम प्रशांत सोनवणे (२१, मूळ रा. भुसावळ जि.जळगाव) अशी मयत विद्यार्थ्यांची नावे असून जयेश अरूण महाजन (२१ रा.म्हसवळ जि.जळगाव) हा युवक अपघातात जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी सरकारवाडा पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील ठक्कर बाजार बसस्थानका बाहेर हा अपघात झाला. मृत व त्यांचा जखमी मित्र शुक्रवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास दुचाकीवरुन ट्रिपलसिट प्रवास करीत होते. त्र्यंबकनाका भागात ते जेवणासाठी हॉटेलची शोधाशोध करीत असतांना हा अपघात झाला. तिघे मित्र जिल्हा रूग्णालयाकडून त्र्यंबकनाक्याच्या दिशेने भरधाव वेगात जात असतांना त्र्यंबक नाक्याकडून येणा-या बसने ठक्कर बाजार बसस्थानकाकडे वळण घेतल्याने दुचाकी बसवर आदळली.
दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू
हा अपघात इतका भयंकर होता की नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट बसच्या पाठीमागील चाकात सापडल्याने तिचा चक्काचूर झाला. तर शुभम कोकाटे आणि शुभम सोनवणे या दोन्ही मित्रांचा जागीच मृत्यू झाला. त्यांचा तिसरा मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर नजीकच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. सोनवणे आणि कोकाटे या दोन्ही कुटुंबातील ही एकुलती एक मुले असल्याने नातेवाइकांनी सकाळी जिल्हा रुग्णालयात आक्रोश व्यक्त केला.
सरकारवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण चव्हाण यांनी पथकासह घटनास्थळी पंचनामा करुन गुन्हा दाखल केला. दरम्यान, शुभम सोनवणे हा जळगाव जिल्ह्यातून महाविद्यालयीन शिक्षणासाठी नाशिकमध्ये वास्तव्यास होता. हे तिघेही मित्र जिल्ह्यातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.