नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – वेगवेगळ्या भागातील अपघातात जखमी झालेल्या दोघा पादचा-यांचा मृत्यू झाला. त्यात ४३ वर्षीय महिलेसह एका अनोळकी पुरूषाचा समावेश आहे. याप्रकरणी नाशिकरोड आणि मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूच्या नोंदी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शेणीत ता. इगतपुरी येथील भारताबाई राजाराम तेलोरे (४३) या शुक्रवारी (दि.९) सकाळी साडे दहा वाजेच्या सुमारास नाशिकरोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा भागातून रस्त्याने पायी जात असतांना त्यांना अज्ञात भरधाव वाहनाने धडक दिली होती. या अपघातात हातापायासह डोक्यास गंभीर दुखापत झाल्याने भाऊ शाम जामणीक यांनी त्यांना तात्काळ बिटको रूग्णालयात प्रथमोपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हारूग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असतांना डॉ.नवनेश रेड्डी यांनी त्यांना मृत घोषीत केले. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास हवालदार दराडे करीत आहेत.
दुसरा अपघात गेल्या सोमवारी (दि.५) भाभानगर भागात झाला. रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास रस्त्याने पायी जाणा-या अनोळखी पुरूषास भरधाव अज्ञात दुचाकीने धडक दिली होती. या अपघातात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला होता. सामाजीक कार्यकर्ते रियाज शेख यांनी त्यास तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी उपचार सुरू असतांना डॉ.माधवी पोगर यांनी त्यास मृत घोषीत केले. याबाबत मुंबईनाका पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलिस नाईक राजू शिंदे करीत आहेत.