संभाव्य पूर परिस्थितीसाठी रामकुंडावर झाली रंगीत तालीम
नाशिक – गंगापूर धरण परिसरात अतिवृष्टी होत असल्याने गंगापूर धरणातून संभाव्य वाढणाऱ्या पाणी पातळीच्या अनुषंगाने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असतो. यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ होवून पूर परिस्थिती निर्माण झाल्यास नदी काठच्या नागरिकांना सतर्ग करुन सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अंतर्गत गोदाघाट येथील रामकुंडावर रंगीत तालीम घेण्यात आली.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे, जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल भगत, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रशांत वाघमारे उपस्थित होते.
गंगापूर धरण परिसरात अतिवृष्टीने होत असल्याने तात्काळ गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात एक लाख क्सुसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला, अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सर्व यंत्रणेला दिली व त्यानुसार सर्व यंत्रणांनी सतर्कता व तत्परता दाखवून रंगीत तालीम पार पाडली. यावेळी शोध व बचाव कार्यासाठी उपलब्ध साधनसामुग्रीची प्रात्याक्षिके करण्यात आली.
रंगीत तालीमेच्या दरम्यान नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी करण्यात येणारी प्रक्रीयेचे प्रात्याक्षिक बचाव पथकामार्फत दाखविण्यात आली. तसेच पोलीस यंत्रणा, अग्निशमन यंत्रणा, रुग्णवाहिका, शववाहिका, यांनी देखील वेळेत येवून आपल्या कार्याची कार्यतत्परता दाखविली.
यावेळी सहायक जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी मार्गदर्शन करुन रंगीत तालीम संपल्याचे जाहिर केले. रंगीत तालीमेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्व यंत्रणांचे व स्वयंसेवकांचे श्रीमती मीना यांनी कौतुक केले.