नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरातून दररोज दुचाकी आणि चारचाकी वाहनांची सर्रास चोरी होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. तक्रार देऊनही नंतर काहीच होत नाही, चोरटेही सापडत नाहीत आणि चोरीस गेलेले वाहनही परत मिळत नाही. अशातच आता चोरट्यांनी नाशिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून पोलिसांची चक्क पेट्रोलिंग दुचाकीच लांबवली आहे. त्यामुळे पोलिस दलातच एकप्रकारे खळबळ उडाली आहे.
नाशिक शहरातील गुन्हेगारी रोखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. नवनियुक्त पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या नेतृत्व आणि मार्गदर्शनाखाली कारभार सुरू आहे. मात्र, गुन्हेगारी रोखण्यात पोलिसांना अपयश येत आहे. शहर परिसरात सर्वच प्रकारच्या गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. हीच गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून शहराच्या विविध भागात पेट्रोलिंग केले जाते. त्यात दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा समावेश आहे. शहरात सर्रासपणे दुचाकी आणि चारचाकी चोरीस जात आहेत. आणि आता तर थेट नाशिक पोलिसांची पेट्रोलिंग दुचाकीच चोरीस गेली आहे. सर्वसामान्यांना त्यांचे चोरीस गेलेले वाहन परत भेटत नसल्याने पोलिसांना तरी त्यांची दुचाकी मिळणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
नाशिक शहरात रविवारी तीन ठिकाणाहून दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यात हवालदार नरेंद्र शिवाजी चौधरी यांच्याकडील पेट्रोलिंगच्या दुचाकीचाही समावेश आहे. चौधरी यांनी दुचाकी वॉशिंगसाठी आडगाव परिसरातील वॉशिंग सेंटरमध्ये दिली होती. आणि याच सेंटरमधून ही दुचाकी चोरीला गेली आहे. ही दुचाकी चोरीला कशी गेली असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. याप्रकरणी पोलिस कसून तसाप करीत आहेत.
Nashik City Police Patrolling Vehicle Theft
Crime Two Wheeler