नाशिक – अंबड पोलिस स्टेशनमधील पोलिस उपनिरीक्षक आणि शिपाई लाच घेताना पकडला गेल्याने ही बाब पोलिस आयुक्त दीपक पांडे यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळेच आयुक्तांनी थेट भाकरी फिरवली आहे. परिणामी, शहरातील पोलिस स्टेशन प्रमुखांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.
पोलिस आयुक्तांनी आज शहरातील गुन्हेगारी कारवायांचा आढावा घेतला. त्यात त्यांनी अंबडपोलिस स्टेशनच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. सिडकोतील बोकाळलेली गुन्हेगारी,फौजदार – शिपाई यांच्यावर झालेल्या एसीबी कारवाई यापार्श्वभूमीवर अंबडचे वरिष्ठ निरीक्षक कुमार चौधरी यांची उचलबांगडी करण्यात आली. मुंबई नाका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांच्याकडे आता अंबडचा कारभार देण्यात आला आहे.
चौधरी यांना विशेष शाखेत नियुक्ती देण्यात आली आहे. भद्रकाली पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे निरीक्षक दत्ता पवार यांच्याकडे मुंबई नाका पोलिस स्टेशनची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी पोलिस निरीक्षकांच्या नियमित बदल्या झाल्या आहेत. त्यात कुमार चौधरी यांना विशेषत्वाने मुदतवाढ देण्यात आली होती.
निवडणुकीपूर्वी बदल
नाशिक महापालिकेची निवडणूक येत्या फेब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात गुन्हेगारी कारवायाही वाढल्या आहेत. सराईत गुन्हेगारांचा विविध राजकीय पक्षांकडून सक्रीय वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी बदल्यांचा वरवंटा फिरवला आहे.