नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नेहमी वर्दळीचे ठिकाण असलेल्या महात्मा गांधी रोड आज चर्चेत आला. निमित्त होते ते पोलिसांनी अचानकपणे केलेल्या कारवाईचे. एमजी रोडवर पार्क केलेल्या वाहनांवर पोलिसांनी बुधवारी दुपारी दंडात्मक कारवाई केली. त्यामुळे व्यापारी वर्गात मोठे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. त्यानंतर येथील व्यापाऱ्यांनी या कारवाईचा निषेध करत आपआपली दुकाने बंद करुन आक्रमक पवित्रा घेतला.
महात्मा गांधी रोडवर वाहतूक नेहमीच कोंडी होत असते. येथील रस्त्यावर पार्क केलेल्या वाहन हा सर्वांचाच चिंतेचा विषय आहे. हा प्रश्न कसा सोडवता येईल याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. पण, येथे वाहतूक कोंडी झाली की पोलिस कारवाईचा बडगा उगारतात. त्यामुळे येथे नेहमी वाद होतो. महात्मा गांधी रोडप्रमाणेच शहरात अनेक ठिकाणी पार्किंगचा प्रश्न आहे. त्याकडेही प्रशासनाने लक्ष देऊन ही समस्या सोडवणे गरजेचे आहे. महात्मा गांधी रोडवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर व्यापारी आक्रमक झाले. तसेच चित्र इतर ठिकाणी होऊ शकते, असे मत व्यापाऱ्यांनी व्यक्त केले.
एकाच दिवसात तब्बल १०८ जणांवर कारवाई
नाशिक शहर पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात रस्त्यावर उतरत रोडरोमियोवर जोरदार कारवाई केली. तसेच, गुटखा विक्रेत्यांवरही कारवाई केली. संपुर्ण शहरात १०८ जणांविरूध्द विविध कलमान्वये कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे ती रोखण्यासाठी पोलिस अॅक्शन मोडवर आले असल्याचे यावेळी बघायला मिळाले. पोलिसांनी पान टप-यांसह चौकात उभ्या राहणा-या टवाळखोरांना पिटाळून काढत पोलिसींगचा हिसका दाखवला.
या मोहिमेद्वारे ७१ व्यक्तींवर महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ११२ – ११७ अन्वये कारवाई करण्यात आली. तसेच शाळा – महाविद्यालय परिसरातील पानस्टॉल आणि गुटखा सिगारेट,तंबाखू विक्रेत्यांना रडारवर घेत पोलिसांनी टपरीचालकांसह धुम्रपान करणा-या व्यक्ती यांच्या विरोधात कोप्ता कायद्यांतर्गत ३७ कारवाया केल्या. तर रोडरोमीओंसह धुम्रपान करणा-या १०८ जणांविरूध्द पोलिसांनी कारवाई केली असून यापुढेही ही कारवाई हाती घेण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
Nashik City Police MG Road Action Shopkeepers Agitation traffic vehicle