नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिक पोलिसांनी हेल्मेट सक्तीचा नवा अध्याय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पोलिसांनी हेल्मेट सक्तीबाबत विविध पर्याय अवलंबले आहेत. त्यासही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याने आता थेट जबर दंडाचे हत्यार पोलिसांनी उपसले आहे. त्याची अंमलबजावणी उद्यापासून (१८ जानेवारी) होणार आहे. हेल्मेट नसलेल्या दुचाकी चालकांना थेट १ हजार रुपये दंड केला जाणार आहे.
शहरात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी सुरू आहे. विविध उपक्रमानंतर आता थेट इ चलान कार्य प्रणालीच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू आहे. मंगळवार (१८ जानेवारी) पासून ही मोहिम तीव्र करण्यात येणार आहे. दुचाकीस्वारांनी नियमीत हेल्मेट वापरावे व दंड टाळावा असे आवाहन पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी केले आहे.
पोलिस आयुक्त म्हणाले की, शहरात गेल्या वर्षभरात ११६ अपघातांमध्ये १२४ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला आहे. त्यातील १११ जणांनी हेल्मेट घातलेले नव्हते. या पार्श्वभूमीवर आम्ही विविध उपक्रम राबवित रस्ते अपघातातील मृत्यू संख्या आटोक्यात आणण्यासाठी शहरात हेल्मेट सक्तीची घोषणा केली. नो हेल्मेट नो पेट्रोल, नो हेल्मेट नो कॉपरेशन यासह दुचाकीस्वारांचे समुपदेशनावर भर देत तब्बल साडे दहा हजार विना हेल्मेट दुचाकीस्वारांना समुपदेशनाच्या माध्यमातून मोटार वाहन नियमांचे धडे दिले आहेत. मात्र तरीही अनेक दुचाकीस्वार विनाहेल्मेट दिसत असल्याने २२ डिसेंबर पासून शहरात इचलानच्या माध्यमातून दंडात्मक कारवाईचा धडाका सुरू करण्यात आला आहे.
पहिल्यांदा सापडणाऱ्या दुचाकीस्वाराकडून ५०० रूपये तर दुसऱ्यांदा सापडणाऱ्या विनाहेल्मेट धारकाकडून १००० हजार रूपयांचा दंड वसूल केला जात आहे. आता उद्यापासून ही मोहिम तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त म्हणाले. दुसऱ्यांदा विना हेल्मेट सापडणाऱ्यांकडून १००० रूपये दंड व तीन महिन्यांसाठी वाहन चालविण्याचा परवाना रद्द करण्यात येणार आहे. दंड न भरणाऱ्यांचे वाहन जप्त केले जाणार आहे. दंड वसुलीनंतर वाहन परत केले जाणार आहे. पोलीस ठाणे निहाय सदरची कारवाई करण्यात येणार आहे. चालकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले आहे.