नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहर परिसरात होणारे अपघात आणि त्यातील मृतांची संख्या लक्षात घेवून आजपासून (दि.१) पासून पुन्हा एकदा हेल्मेट सक्तीचा बडगा उगारण्यात आला आहे. या कारवाईच्या पहिल्याच दिवशी पोलिस ठाणे निहाय धडाकेबाज कारवाई करण्यात आली. अवघे पोलिस दल रस्त्यावर उतरल्याने बेशिस्तांची चांगलीच धावपळ उडाली. दिवसभरात ५५४ दुचाकीस्वारांनावर कारवाईक करीत पोलिसांनी अडिच लाखाहून अधिक दंड वसूल केला. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार असून, दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे. दरम्यान, उद्या, शुक्रवारी शहराच्या कुठल्या भागात ही कारवाई असणार आहे त्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शुक्रवारी दिवसभरात तारवाल सिग्नल, राज स्वीट, सिटी सेंटर मॉल, बाफणा ज्वेलर्स, खुटवड नगर, माऊली लॉन्स, विहित गाव, भैरवनाथ मंदिर या ठिकाणी सकाळी १०:०० ते दुपारी १२:०० आणि सायंकाळी ४:०० ते ६:०० यादरम्यान विनाहेल्मेट चेकिंग होईल, असे पोलीस आयुक्तांनी सांगितले आहे.
शहर परिसरात यंदा विनाहेल्मेट ८३ दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून २६१ वाहनधारक गंभीररित्या जखमी झाले. या पार्श्वभूमिवर शहर पोलिसांनी १ डिसेंबरपासून पुन्हा हेल्मेट सक्ती लागू केली. त्यानुसार पोलिस ठाणे निहाय बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले असून स्वामी नारायण चौक, संतोष टी पॉइंट, एबीबी चौक, अशोक स्तंभ, गरवारे पॉइंट, पाथर्डी फाटा, बिटको चौक, बिटको महाविद्यालयासमोर आदी ठिकाणी पहिल्या दिवशी बॅरेकेटींग लावून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी पोलिसांनी सकाळी दहा ते १२ आणि सायंकाळी पाच ते सात अशी वेळ निश्चित केलेली आहे. या काळात अवघे पोलिस दल रस्त्यावर उतरल्याने सर्वत्र वाहनधारकांवर कारवाई झाली.
https://twitter.com/nashikpolice/status/1598330805293486086?s=20&t=CwNvyB7MHKr8o-jMdOix4w
हेल्मेट परिधान न केल्याबद्दल प्रत्येकी ५०० रुपये दंड आकारला गेला. जे वाहनधारक जागेवर दंड भरण्यास तयार झाले नाहीत, त्यांंच्यावर प्रलंबित प्रकरण म्हणून कारवाई केली गेल्याचे वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सायंकाळी उशीरापर्यंत ही मोहिम सुरू राहिल्याने ५५४ विनाहेल्मेट दुचाकीस्वार पोलिसांच्या हाती लागले. संबधीताकडून २ लाख ७० हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. या कारवाई दरम्यान विनाहेल्मेटधारींची चांगलीच पंचाईत झाली. अनेकांनी गल्ली बोळाचा सहारा घेत कारवाई टाळण्याचा प्रयत्न केला.
गेल्या एक – दीड हेल्मेट सक्तीसाठी अवलंबिलेले मार्ग वादाचे विषय ठरले होते. हेल्मेट नसल्यास पंपावर पेट्रोल देण्यास प्रतिबंध, पंप चालकांवर कारवाई, शासकीय कार्यालये व महाविद्यालयात विना हेल्मेट वाहनधारकास प्रवेश दिल्यास थेट प्रमुखावर कारवाई हे निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. त्यास विरोध होऊनही तत्कालीन आयुक्तांनी अमलबजावणीचा आग्रह धरला होता. या पार्श्वभूमीवर, नव्याने लागू झालेली हेल्मेट सक्ती तितकी कठोर नसल्याचे वाहनधारक सांगतात.
Nashik City Police Helmet Checking Drive