नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- बाशी बेहनवाल गँगवर अखेर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधियम (मोक्का) कायद्यान्वये कारवाई केली आहे. या गँगच्या नऊ जणांवर ही कारवाई करण्यात आली असून, त्यातील दोन जण अद्याप फरार आहेत. याबाबत पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी शनिवारी (दि.२९) आदेश जारी केले आहेत. लुटमारीसह वाहनांची तोडफोड करीत धुमाकूळ ही गॅंग करत होती.
नेम्या उर्फ रोशन रामदास पवार (रा. निलगीरीबाग, औरंगाबादरोड), अमन सुरज वर्मा (रा. वंदे मातरम अपार्टमेंट, औटेमळा, उपनगर), भैयू उर्फ सत्यम संजित ढेनवाल (रा. हनुमाननगर, एकलहरा रोड), रोहन राठोड उर्फ पियुष शैलेंद्र खोडे, सुधांशू उर्फ सोनू राजेद बेग (रा. दोघे फर्नांडीसवाडी नाशिकरोड), मोहिज जावेद शेख, मोहिन जावेद शेख (रा. दोघे विठ्ठल मंदिराजवळ, विहीतगाव) व घटनेपासून पसार असलेले दोघे आदी ९ संशयितांविरोधात मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे.
गेल्या सोमवारी (दि.२४) या गँगने उपनगर पोलिस ठाणे हद्दीत आपल्या घरासमोर वाहन पार्क करणा-या एकास जीवे मारण्याची धमकी देत लुटमार केली होती. या वेळी सदर व्यक्तीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करीत या टोळीने परिसरातील अनेक वाहनांची तोडफोड केली होती. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोघे अद्याप फरार आहेत. पसार बाशी उर्फ शिवम उर्फ शुभम हरबिर बेहनवाल हा या टोळीचा म्होरक्या असून त्याच्यासह या गॅगच्या सदस्यांवर उपनगर, नाशिकरोड, इंदिरानगर, अंबड व गंगापूर पोलिस ठाण्यात २५ हून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
संशयितांनी कट रचून लुटमारीसह वाहनांची तोडफोड केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाल्याने या टोळीवर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या संकल्पनेतून सर्व पोलिस ठाणे हद्दीत चौक सभा घेवून उपद्रवी गावगुंडाची माहिती संकलीत केली जात असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणा-यांवर मोक्का आणि स्थानबध्दतेच्या कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.