नाशिक – शहराच्या मध्यवर्ती भाग असलेल्या भद्रकालीत गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला कुंटणखाना अखेर सील झाला आहे. नाशिक पोलिसांनी ही कारवाई केली आहे. याप्रसंगी एका महिलेने स्वतःवर रॉकेल टाकून घेत स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पोलिस पथकाने मात्र, या महिलेचा बचाव करीत तिची समजूत काढली. तसेच, ह कारवाईही पूर्ण केली आहे.
भद्रकाली हा नाशिकच्या मध्यवर्ती परिसर आहे. याच भागात गेल्या अनेक दशकांपासून कुंटणखाना सुरु होता. कुंटणखान्यासंदर्भात पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी काही दिवसांपूर्वीच माहिती मागविली होती. भद्रकाली परिसरात काही घरांमध्ये बेकायदेशीररित्या कुंटणखाना कार्यरत असल्याची माहिती भद्रकाली पोलिस स्टेशनच्यावतीने आयुक्तांना देण्यात आली.
भद्रकाली पोलिसांच्या अहवालानुसार, आयुक्त पांडे यांनी निर्देश दिले की, संबंधित कुंटणखाना चालकांवर कारवाई करावी आणि कुंटणखाना बंद करण्यात यावा. त्यानुसार, कुंटणखाना चालकांना भद्रकाली पोलिसांनी आठवडाभरापूर्वीच नोटीस बजावली होती. देहविक्री करणाऱ्या महिलांना येथून स्थलांतरित होण्याचे सांगण्यात आले.
मात्र, कुंटणखाना चालकांनी या नोटिसीकडे दुर्लक्ष केले. कुंटणखाना सुरूच असल्याने अखेर आज पोलिसांच्या मोठ्या पथकाने कारवाई केली. यावेळी संबंधित महिलांना घराबाहेर पडण्यास पोलिसांनी वेळ दिला. मात्र येथील महिलांनी घराबाहेर पडण्यास नकार देत विरोध दर्शविला. घटनास्थळी असलेल्या महिला पोलिसांनी सदर महिलांची समजूत काढली. तसेच त्यांना बाहेर काढले. यावेळी संदर्भ रुग्णालयाच्या मागील भिंतीस लागून असलेल्या कुंटणखान्यावर कारवाई करण्यात आली. हा कुंटणखाना सील करण्यात आला आहे.