नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या पंचवटीमधील गणेशवाडी येथील सप्तशृंगी मातेच्या मंदिरातील पितळी पादुका चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही चोरीची घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी मंदिरांना लक्ष्य केल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे.
मंदिरातील चोरीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली आहे. दृश्यामध्ये चोरटा चोरी करताना दिसत आहे. वर्दळीच्या ठिकाणी चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस तपास करत आहेत.
नेहमीप्रमाणे काही भाविक सकाळी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना इथे काहीतरी अपप्रकार घडल्याचा संशय आला. त्यामुळे त्यांनी तात्काळ मंदिरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले. त्यात एक चोरटा येथे चोरी करताना दिसला.
चोरट्याने देवीच्या मंदिरातून पितळी पादुका तसेच इतरही काही साहित्य चोरले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून वर्दळीच्या ठिकाणी अशी चोरी झाल्याने पोलिसांचा गुन्हेगारांवर आता काही धाक उरलाय की नाही असा प्रश्न सर्व सामान्यांना पडू लागला आहे.