नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – उदरांचाच एक प्रकार असलेल्या घुशीमुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नाशिक शहरात घडली आहे. ही महिला गंजमाळ परिसराची रहिवासी आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, हा प्रकार कसा काय घडला याबाबतही जोरदार चर्चा होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गंजमाळ भागात अत्यंत दाट वस्ती आहे. बबाबाई गायखे (वय ९० वर्षे) ही वृद्ध महिला गंजमाळ मधील श्रमिकनगर झोपडपट्टीत अनेक वर्षांपासून राहते. या महिलेला दोन मुले आहेत. मात्र, ते तिच्यासोबत राहत नाहीत. सध्या या महिलेसोबत नातू राजू आणि राहुल एखंडे हे राहत होते. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास एक धक्कादायक प्रकार घडला.
रात्री झोपेत असताना बबाबाई यांच्या हातासह पंजाला घुशीने कुरतडले. त्यामुळे त्यांचा हात रक्तबंबाळ झाला. त्यांनी रात्रीच दवाखान्यात दाखल होणे आवश्यक होते. मात्र, त्यांना दाखल करण्यात आले नाही. अखेर ही बाब सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके यांना कळाली. त्यांनी तातडीने बबाबाई यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांची प्रकृती खालावली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.
वृद्ध महिलेचा मृत्यू घुशीमुळे झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तसेच, गंजमाळ परिसरात रस्त्याचे आणि भुयारी गटारीचे काम सुरू आहे. यामुळेच उंदीर व घुशींचा प्रादुर्भाव वाढल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. मात्र, याकडे नाशिक महापालिका कानाडोळा करीत असल्याचीही त्यांची तक्रार आहे.
Nashik City Old Women Died Due to Rat Bite