नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्यातील सत्ताधारी गटाचा पदाधिकारी असलेल्या एका माजी नगरसेवकाच्या दबावाखाली ‘कर्मयोगीनगर’ नावाचा काढलेला फलक पुन्हा त्वरित लावावा, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनने दिला आहे. महापालिका प्रशासक डॉ. अशोक करंजकर, शहर अभियंता नितीन वंजारी यांना याबाबतचे निवेदन सोमवारी, २१ ऑगस्ट २०२३ रोजी देण्यात आले आहे.
प्रभाग २४ मधील गोविंदनगर रस्त्यावर कर्मयोगीनगर येथे महापालिकेच्या मान्यतेने आरडी ग्रुपच्या सीएसआर फंड आणि संकल्पनेतून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, सत्कार्य फाउंडेशनसह रहिवाशांचे आंदोलन व पाठपुराव्याने जॉगिंग ट्रॅक व सेल्फी पॉईंट साकारण्यात आला. त्याबद्दल निवेदनातून जाहीर आभार मानण्यात आले आहेत. ज्यांनी या कामासाठी बोटभर चिठ्ठीची तसदी घेतली नाही, त्या राज्यातील सत्ताधारी पक्षाचा पदाधिकारी असलेल्या माजी नगरसेवकाने संकल्पना व कामाचे श्रेयही लाटले. सत्तेच्या मस्तीत १४ ऑगस्ट २०२३ रोजी एकतर्फी लोकार्पण घडवून आणून स्वत:ची पाठ स्वत:च थोपटून घेतली. हे प्रावीण्य दाखवताना त्यांचा इतका तोल गेला की, प्रशासनावर दबाव टाकून त्यांनी या सर्कलवरील ‘कर्मयोगीनगर’ नावाचा फलकच गॅस कटरने हटवून घेतला.
हा फक्त फलकच नाही, तर या परिसराची ही ओळख आहे ती पुसण्याची, नाशिककरांच्या भावना चिरडण्याची ही कृती प्रशासनाने या माजी नगरसेवकाच्या दबावाखाली केली आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. सोमवारी, २१ ऑगस्ट रोजी या घटनेला आठ दिवस झाले आहेत. या ठिकाणी पुन्हा हा फलक लावण्यात आलेला नाही.
कर्मयोगीनगरची कायमची ओळख पुसण्याचा कुटील डाव जनता सहन करणार नाही. ‘कर्मयोगीनगर’ नावाचा फलक पुन्हा दर्शनी भागात त्वरित लावावा, अन्यथा जनता रस्त्यावर उतरली, जनभावनांचा उद्रेक झाला, तर त्यास सत्ताधार्यांच्या दबावाखाली जनविरोधी काम करणारे प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या निवेदनाद्वारे सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, मयुर आहेर, धवल खैरनार, संगीता देशमुख, प्रभाकर खैरनार, रवींद्र सोनजे, डॉ. शशीकांत मोरे, शैलेश महाजन आदींसह ज्येष्ठ नागरिक संघ व परिसरातील नागरिकांनी दिला आहे.
nashik city news