नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आर डी सर्कल ते बाजीरावनगर हा रस्ता २४ मीटर रूंदीचा करावा, कर्मयोगीनगर ते भामरे मिसळ हा रस्ता विकसित करावा, चार एकरमध्ये पार्क विकसित करावे, यासह प्रभाग २४ मधील विविध विकासकामांच्या मागण्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष व सत्कार्य फाउंडेशनने केल्या आहेत. याबाबतचे निवेदन शिष्टमंडळाने बुधवारी, २ ऑगस्ट रोजी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांना दिले.
सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख) यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांची भेट घेवून निवेदन दिले. कर्मयोगीनगरहून बडदेनगर ते पाटीलनगर या रस्त्याला जोडणारा (भामरे मिसळ ते रणभूमी) या रस्त्याच्या प्रस्तावाला मंजुरी द्यावी. विकास आराखड्याप्रमाणे आर डी सर्कल ते बाजीरावनगर हा रस्ता २४ मीटर रुंदीचा करून नंदिनी नदीवर पूल बांधावा, उर्वरित जागेत जॉगिंग ट्रॅक विकसित करा.
उखडलेल्या रस्त्यांचे खडीकरण करून, पावसाळ्यानंतर डांबरीकरण करावे. सीएसआर फंडातून इंडिगो पार्क येथील जॉगिंग ट्रॅक विकसित करण्याचे काम सुरू करावे. प्रभागात पर्जन्यवाहिन्या टाकाव्यात. सभागृहांची दुरूस्ती करून नूतनीकरण करावे. बंद असलेली सभागृह ज्येष्ठ नागरिक व महिलांना योगा, प्राणायाम व व्यायामासाठी खुली करून द्यावीत. गोविंदनगर येथील सर्व्हे नंबर ७८८ जवळील डीपी रोडवर नंदिनी नदीवर पूल बांधण्याचा प्रस्ताव मंजूर करावा. प्रभागातील उद्यानांची दुरुस्ती करावी. कर्मयोगीनगर येथे सर्व्हे नंबर ९९२-९९३ मध्ये चार एकर क्षेत्र पार्कसाठी आरक्षित करण्यात आले आहे, येथे पार्क विकसित करावे, सध्या सुमारे एक एकर क्षेत्र महापालिकेच्या ताब्यात असून, प्रथम ते विकसित करण्यासाठी कार्यवाही करावी आदी मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले.
यानंतर शहर अभियंता नितीन वंजारी यांचीही भेट घेण्यात आली. यावेळी सत्कार्य फाउंडेशनचे अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड (देशमुख), शिवसेना कार्यकर्त्या चारुशीला गायकवाड (देशमुख), बाळासाहेब मिंधे, अॅड. ललित निकम, संगिता देशमुख, प्रभाकर खैरनार, बापूराव पाटील, डॉ. शशीकांत मोरे, वसंत चौधरी, विनोद पोळ, मालती कोलते, मिनाक्षी पाटील, देवयानी खैरनार, लता चौधरी, वंदना पाटील, उज्ज्वला सोनजे, संकेत गायकवाड (देशमुख) आदींसह रहिवाशी हजर होते.